05 June 2020

News Flash

Coronavirus outbreak : वरळीचा धोका वाढला!

एनएससीआय’वर ५०० रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष

वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.

परिसरात १८४ रुग्ण; ‘एनएससीआय’वर ५०० रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष

मुंबई : वरळी-प्रभादेवी परिसरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून बुधवापर्यंत या भागांतील रुग्णांची संख्या १८४ झाली आहे. या भागातील रुग्णांचा वाढता आकडा आणि संभाव्य संसर्ग लक्षात घेऊन वरळीच्या सरदार वल्लभभाई स्टेडियममध्ये ५०० खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.

वरळी परिसरातील रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग चिंतेत आहे. वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर यांसारख्या दाटीवाटीने पसरलेल्या भागात संशयित रुग्णांना घरात अलग करून ठेवणे अशक्य असल्यामुळे तिथे संसर्ग वाढतच होता. त्यामुळे पालिकेने अशा संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी आधी पोद्दार रुग्णालयात व्यवस्था केली होती. त्यानंतर आता वरळीच्या ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’च्या ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम’मध्ये सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ात पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना आपल्या विभागातील वापरात नसलेले सभागृह, इमारती अशा मालमत्ता विलगीकरण कक्षासाठी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या ठिकाणी हे कक्ष तयार करण्यात आले.

 

महापालिकेचे काम, अध्यक्षांची चमकोगिरी

महापालिकेने सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये धोकादायक गटातील संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार केले असले तरी एनएससीआयचे अध्यक्ष विरेन शहा हे मात्र त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विलगीकरण क्षेत्रात जाऊन प्रसारमाध्यम व छायाचित्रकारांना मुलाखत देत होते. या गंभीर बाबीची दखल घेऊन पालिकेने विरेन शहा यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

बोरिवलीत चार नवे रुग्ण

बोरिवली पश्चिम येथे गुरुवारी चार नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गोराईच्या योगेश्वर इमारतीतील एक रहिवासी चेंबूरच्या रुग्णालयात दाखल होते. त्यांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ते राहत असलेली इमारत प्रतिबंधित करण्यात आली आहे. बुधवारी एसबीआय बँके च्या चिकू वाडी येथील सेवा निवास इमारतीमध्ये (क्वार्टर्स) एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यालाही चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी खासगी प्रयोगशाळेत केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र दुसरी चाचणी करेपर्यंत त्यांचे घरातच विलगीकरण करण्यात आले. चारकोपच्या शिववीर इमारतीतील करोनाबाधित रुग्णाची ८० वर्षीय पत्नी आणि २९ वर्षीय मुलगी यांनाही करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 1:19 am

Web Title: 184 coronavirus positive patients in worli area zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : ‘हिंदुजा’त नवे रुग्ण दाखल करणे बंद
2 यंदा पावसाळ्यात लोकल वेळापत्रक विस्कळीतच?
3 पशुखाद्य, औषधांच्या तुटवडय़ामुळे पाळीव प्राण्यांचे हाल
Just Now!
X