मुंबई : समुद्रात मासेमारी करताना चुकू न जाळ्यातील अडकलेल्या १८६ संरक्षित जलचरांना पुन्हा पाण्यात सोडण्यात आले असून त्याचा मोबदला म्हणून मच्छीमारांना ३० लाख २८ हजार ५० रुपये भरपाई कांदळवन कक्षाने दिली आहे.

महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी राहणारे नागरिक उदरनिर्वाहासाठी प्रामुख्याने मासेमारीवर अवलंबून असतात. मासेमारी करताना बऱ्याचदा चुकून काही संरक्षित प्रजातींतील जलचर जाळ्यात सापडतात. अशा वेळी मच्छीमारांना जाळे कापून या जलचरांना बाहेर काढावे लागते. जाळे कापल्याने मच्छीमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी शासनाने भरपाई योजना सुरू केली आहे. जाळे कापून जलचराला पाण्यात सोडल्यानंतर त्या जाळ्याचा पंचनामा क रून जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मच्छीमाराला दिली जाते.

कांदळवन कक्षातर्फे  विविध कार्यशाळांच्या माध्यमातून मच्छीमारांमध्ये जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या १८६ संरक्षित जलचरांची सुटका करून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे. यात ९६ ऑलिव्ह रिडले कासव, ५२ हिरवी सागरी कासवे, ३ हॉक्सबिल कासवे, १ लेदरबॅक कासव, २ जाएंट गिटार फिश, १ हम्पबॅक डॉल्फिन, १ फिनलेस पॉरपॉइस आणि ३० व्हेल शार्क  (बहिरी मासे) यांचा समावेश

आहे. या योजनेमुळे आणि मच्छीमारांच्या सहकार्यामुळे जलचरांच्या प्रजातींचे संरक्षण करणे शक्य झाले आहे.