मुंबईत करोनाचे १८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ११८२ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत एकट्या मुंबईत करोनाची लागण झाल्याने ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या ११ जणांचा मृत्यू आज झाला त्यापैकी १० जणांना इतर आजारांनीही ग्रासले होते. तसेच त्यांचे वयही झाले होते. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मुंबईतल्या धारावीत करोनामुळे आत्तापर्यंत चारजणांचा मृत्यू झाला आहे. यामुळेच या भागात स्क्रिनिंग सुरु करण्यात आले आहे. तसंच मुंबईतल्या धारावीसाठी वेगळा कृती आराखडाही आखण्यात आला आहे. यानुसार डॉक्टरांची टीम घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करणार आहे. तसेच सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येतं आहे. जे रुग पॉझिटिव्ह आढळतील त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यात येतील असेही संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

लॉकडाउनचा कालावधी वाढला

महाराष्ट्रातील लॉकडाउनचा कालावधी हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. त्याचवेळी त्यांनी ही घोषणा केली. तसंच सगळ्यांनी काटेकोरपणे लॉकडाउनचे नियम पाळावेत असेही त्यांनी स्पष्ट केले.