दहीहंडी आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आल्याने ‘बजरंग बली की जय’ आणि ‘वंदे मातरम्’चा एकत्रित गजर मंगळवारी राज्यासह मुंबई-ठाणे आणि उपनगरांमध्ये घुमला.  यंदा काहीशा कमी उत्साहात आणि डीजेच्या कर्णहादऱ्यांपासून मुक्त असलेल्या गोविंदा उत्सवाला दुर्घटनांचे गालबोट लागले. पालघर आणि नवी मुंबईमधील ऐरोली परिसरात दोन गोविंदांचा मृत्यू झाला. मुंबई-ठाणे परिसरात १२५ हून अधिक गोविंदा जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

दरवर्षी डीजेच्या ढणढणाटात झाकोळणारे दहीहंडीचे मनोरे यंदा शांततेत उठून दिसले. मुंबई व ठाण्यातील काही भागांचा अपवाद वगळता दहीहंडीचा आनंद सर्वानी पारंपरिक वाद्ये आणि ध्वनीवर्धकावरील सुसह्य़ आवाजाच्या गीतांनी अनुभवला. मात्र वांद्रे येथे सत्ताधारी भाजपच्या दहीहंडीत आणि ठाण्यात सेनेच्या टेंभीनाक्यावरील दहीहंडीत ध्वनीक्षेपकांवर मोठमोठय़ाने गाणी लावल्याने कोलाहल झाला होता.  सुरक्षेच्या नियमाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यामुळे मुंबई, ठाण्यात १२५ हून अधिक गोविंदा जखमी झाले. पालघरमधील धनसार येथील रोहन गोपीनाथ किणी हा २१ वर्षीय गोविंदा दहीहंडी फोडताना खाली पडून जखमी झाला. त्याला तातडीने पालघरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दहीहंडी फोडत असताना त्याला आकडी आल्याने तो खाली कोसळला असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.  ऐरोलीच्या राधिकाबाई मेघे महाविद्यालयाच्या मैदानात शिवसेना पदाधिकारी विजय चौगुले यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात चुनाभट्टी येथील जयेश सारले(३४) या तरूणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या प्रकरणी आयोजकांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तीदर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

ठाण्यात दहीहंडीला फिफा फुटबॉलचा फिव्हर

ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या उत्सवात फिफा फुटबॉलची थीम सजविण्यात आली आहे. तसंच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यानं गोविंदा चेहऱ्यावर तिरंगा रंगवून दहीहंडी फोडताना दिसत आहेत. मुंबई ठाण्यात थोडा पाऊस झाल्यानं अनेक गोविंदा पथकांचा उत्साह काहीसा मावळलेला दिसून आला. दुपारनंतर गोविंदा पथकांचा उत्साह ठाण्यात वाढलेला दिसून येतो आहे.

दहीहंडी उत्सवावर जीएसटीचा परिणाम

मुंबईतल्या दोन मोठ्या गोविंदा मंडळांनी दहीहंडी उत्सव यावर्षी आयोजित केलेला नाही. जीएसटीचा परिणाम दहीहंडी उत्सवावर दिसून आला. अनेक दहीहंडी मंडळांनी यंदा छोट्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्याचाही निर्णय घेतला आहे. तसंच जीएसटी आणि आयकर विभागाच्या भीतीनं बक्षीसांच्या भल्या मोठ्या रकमाही नियंत्रणात आणण्यात आल्या आहेत.

अनेक गोविंदा पथकं सहा महिने अाधीपासून थर लावण्याचा सराव करत असतात. दरवर्षी गोविंदाचा उत्साह तसूभरही कमी होताना दिसत नव्हता, यावेळी मात्र अनेक गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सवात सहभाग घेतलेला नाही. जीएसटी, आयकर विभाग यांच्या रडारवर आपण येऊ नये म्हणून अनेक मंडळांनी बक्षीसाच्या रकमाही कमी केल्या आहेत. ठाण्यात थोड्याच वेळापूर्वी शिवसाई गोपाळ पथकाने ९ थरांची दहीहंडी फोडल्याची माहिती समोर आली आहे.