बॉयफ्रेंडला मदत करण्यासाठी १० लाखांवर डल्ला मारणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या कांदिवली भागात ही घटना घडली आहे. राधा गुप्ता असे या १९ वर्षीय तरुणीचे नाव आहे. तिचा बॉयफ्रेंड आमिर नौशाद खान हा गोवंडी या ठिकाणी राहतो. कलिना भागात ही मुलगी लपून बसली होती. तिला पोलिसांनी अटक केली. बॉयफ्रेंडला व्यवसायासाठी मदत व्हावी म्हणून या तरुणीने स्वतःच्याच घरातल्या १० लाखांवर डल्ला मारला.
३० ऑगस्ट रोजी या तरुणीने घरातून १० लाख रुपये चोरले. त्यानंतर ती बॉयफ्रेंड आमिर नौशाद खानसोबत पळून गेली. जेव्हा या तरुणीच्या पालकांना चोरीबाबत समजले तेव्हा त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या मुलीचा मोबाईल नंबर आणि तिच्या बॉयफ्रेंडचा मोबाईल नंबर ट्रॅक केला. त्यानंतर हे दोघे मुंबईतल्या कलिना भागात लपून बसल्याचं समजलं. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या दोघांनाही अटक केली. या मुलीकडून पोलिसांनी ७ लाख रुपये जप्त केले आहेत.
“माझ्या बॉयफ्रेंडला म्हणजेच आमिरला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्याला मदत व्हावी म्हणून मी दहा लाख रुपये चोरले ” अशी कबुली या मुलीने पोलिसांकडे दिली आहे. या दोघांची भेट आझमगढमध्ये झालेल्या एका लग्नात झाली होती. या दोघांनाही कोर्टापुढे हजर करण्यात आलं. या दोघांनाही कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2019 7:50 pm