News Flash

मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणातच ‘बिघाड’

मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवर १२१ लोकलच्या १,६०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या होतात.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद आणि धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

२०१६-१७ मध्ये फाटक व सिग्नल बिघाडामुळे १९,३११ फेऱ्या उशिराने; ओव्हरहेड वायरचाही फटका

स्थानकात येताच उशिराने धावत असणाऱ्या लोकल, त्यामुळे प्रवासात प्रचंड गर्दीचा करावा लागत असलेला सामना आणि प्रवाशांचे होणारे हाल हे नेहमीच पाहण्यास मिळते. मध्य रेल्वेवरील लोकल गाडय़ांचा वक्तशीरपणा असाच काहीसा बिघडला असून त्यामुळे लोकल वेळेवर धावणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. २०१६-१७ मध्ये मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाडय़ांचा वक्तशीरपणा पाहिल्यास त्यात काहीएक सुधारणा झालेली नाही. विविध कारणांमुळे तब्बल २२ हजार ४१० लोकल फेऱ्यांचा वक्तशीरपणा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. यात सर्वाधिक रेल्वे फाटक व सिग्नलमधील बिघाडामुळे १९ हजार ३११ फेऱ्या उशिराने धावल्या. त्यानंतर ओव्हरहेड वायर व लोकलमधील बिघाडामुळे सर्वात जास्त लोकल फेऱ्यांचे वेळापत्रकही बिघडल्याचे सूत्रांनी सांगितले.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवर १२१ लोकलच्या १,६०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या होतात. या फेऱ्यांमधून दररोज ४० लाख प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास करताना मात्र विविध कारणांमुळे लोकल उशीराने धावत असतात. त्याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. २०१६-१७ मध्ये मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्यांचा वक्तशीरपणा पाहिल्यास चांगलाच बिघडला आहे. यात रेल्वे फाटक आणि सिग्नल बिघाडामुळे तर १९,३११ लोकल फेऱ्यांचे वेळापत्रकच बिघडले. मुख्य मार्गावरील कळवा, दिवा, ठाकुर्ली बरोबरच कुर्ला व चुनाभट्टी येथील फाटक रेल्वेला डोकेदुखी ठरत आहे. नुकतेच ठाकुर्ली येथे फाटक बंद करण्यात आले. त्यामुळे मध्य रेल्वेबरोबरच प्रवाशांनाही थोडा दिलासा मिळाला आहे. १९ हजार ३११ फेऱ्यांपैकी सिग्नल बिघाडामुळे ५,७९१ तर फाटकामुळे १३,५२० फेऱ्यांचा समावेश आहे.  ओव्हरहेड वायर आणि लोकलमधील बिघाड हेदेखील रेल्वेसाठी मोठे आव्हान आहे. मोठय़ा प्रमाणात चालवण्यात येणाऱ्या फेऱ्या आणि देखभाल-दुरुस्तीसाठी मिळणारा कमी वेळ यामुळे तांत्रिक बिघाडाचा सामना सातत्याने करावा लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकलमधील बिघाडाने २,७५० तर ओव्हरहेड वायर बिघाडामुळे २,८७२ फेऱ्या उशिराने धावल्याची माहिती देण्यात आली.

* २०१५-१६ मधे २१ हजार ५०८ लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले होते. हे पाहता यंदाच्या वर्षांत त्याचे प्रमाण वाढले.

* अन्य कारणांमुळे लोकल फेऱ्यांचा बिघडलेला वक्तशीरपणा

१) लोकलमधील चैन खेचणे- ३,११९ फेऱ्या

२) रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातामुळे- १,७२५ फेऱ्या

मेल-एक्सप्रेस गाडय़ांमुळेही फटका

मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या मेल ,एक्स्प्रेस गाडय़ांना प्राधान्य दिले जाते व लोकलला मागे ठेवले जाते. त्यामुळे लोकल उशिराने धावतात. २०१६-१७ मध्ये या कारणांमुळे ४ हजार ७१२ फेऱ्या उशिराने धावल्या होत्या.

ल्ल एप्रिल २०१७ ते ऑगस्ट २०१७ पर्यंतही अनेक तांत्रिक बिघाडांचा सामना मध्य रेल्वेला करावा लागला आहे. मंगला एक्स्प्रेसचे इंजिन ३० जून रोजी कल्याण स्थानकात घसरले होते. तेव्हा १५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यासह आणखी मुख्य घटनांमध्ये ३ जुलै रोजी माटुंगा स्थानकाजवळ लोकलमध्ये बिघाड, २२ जुलै रोजी कांजूरमार्ग ते भांडुप स्थानकांदरम्यान रुळाला तडा, वाशिंद ते आसनगावदरम्यान एका मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला, १२ ऑगस्ट रोजी टिळक नगर ते चेंबूरदरम्यान रुळाला तडा, १९ ऑगस्ट रोजी अंबरनाथजवळ लोकलचा पेन्टाग्राफ तुटला होता. आसनगावजवळ २९ ऑगस्ट रोजी दुरोन्तोचे डबे घसरून चार ते पाच दिवस लोकल सेवेचा बोजवारा उडाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2017 5:00 am

Web Title: 19311 central railway services delayed in 2016 and 2017
टॅग : Central Railway
Next Stories
1 घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद
2 दूरस्थ व मुक्त शिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रिया रखडली
3 मध्य रेल्वेचा ‘पारदर्शक’ प्रवास
Just Now!
X