News Flash

तब्बल ५६ वर्षांनी ते शाळेत आले एकत्र, मराठी शाळेसाठी निधी उभारण्याचा निर्धार

शिकून-सवरून जगाच्या पाठीवर माणूस नोकरी-धंद्यासाठी कुठेही गेला तरी तो आपली शाळा आणि शाळेतले वर्गमित्र विसरू शकत नाही, याचा प्रत्यय नुकताच आला

शिकून-सवरून जगाच्या पाठीवर माणूस नोकरी-धंद्यासाठी कुठेही गेला तरी तो आपली शाळा आणि शाळेतले वर्गमित्र विसरू शकत नाही, याचा प्रत्यय नुकताच आला. सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमधून १९६३मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन करीअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळल्यामुळे वेगळे झालेले वर्गमित्र आणि वर्गमित्रिणी एकत्र आले. तब्बल ५६ वर्षांनी या सर्वांनी एकत्र शाळेत पाऊल टाकले. सर्वात विशेष म्हणजे, यासाठी पुढाकार घेतला तो अमेरिकेत स्थायिक झालेल्या शाळेच्या एका माजी विद्यार्थ्याने !

वयाच्या सत्तरीत असलेले अनिल देशपांडे हे डी. एस. हायस्कूलचे माजी विद्यार्थी. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथे खूप मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारुपाला आले. आज अमेरिकेतील पहिल्या १० मोठ्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. विशेष म्हणजे, अमेरिकेतल्याच फ्लोरिडा राज्यातील ओरलॅंडो शहराचं महापौरपदही त्यांनी भूषवलं आहे. ज्यांच्यासोबत आपण शैक्षणिक श्रीगणेशा केला त्या आपल्या वर्गमित्रांना तसंच वर्गमैत्रिणींना भेटण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यासाठीच १९६३मध्ये डी. एस. हायस्कूलमधून शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बॅचला एकत्र आणण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्या मदतीला आले, भारतातल्या त्यांच्या व्यवसायाचे सहकारी आणि वर्गमित्र अशोक दोशी.

शाळेतून आपल्या बॅचची यादी मिळवून प्रत्येकाला जमेल तसा संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वर्गमित्रांपैकी कुणी पुण्यात होतं, कुणी हैदराबादला तर कुणी बॅंगलोरला. या सर्वांना संपर्क साधून एकत्र आणणं ही काही साधी गोष्ट नव्हती, पण शाळेवरील प्रेमापोटी अनिल देशपांडे आणि अशोक दोशी यांनी त्यांच्या सर्व वर्गमित्रांना एकत्र आणलंच, अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.

“तब्बल ५६ वर्षांनी आपल्या शाळेत एकत्र आलेल्या सत्तरीतल्या ह्या माजी विद्यार्थ्यांचा उत्साह अतिशय दांडगा होता. हसतखेळत त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. आपण ज्या शाळेत शिकलो ती आपली शाळा उत्तम प्रगतीपथावर असल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला”, असंही राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

“ आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम डी. एस. हायस्कूल करत आहे. शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जाताहेत. आमची शाळा अधिकाधिक सक्षम व्हावी, तिच्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जावेत, यासाठी शाळेला आर्थिक सहकार्य करण्याचा निर्धार आम्ही सत्तरीतल्या वर्गमित्रांनी केला आहे. शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावणं हे माजी विद्यार्थ्यांचं कर्तव्यच आहे, असे ओरलॅंडोचे माजी महापौर आणि डी. एस. हायस्कूलचे माजी विद्यार्थी अनिल देशपांडे म्हणाले”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 3:46 pm

Web Title: 1963 batch sion d s high school students reunion marathi school
Next Stories
1 विनाहेल्मेट प्रवास जीवघेणा
2 तपासाबाबत तडवी कुटुंबीय साशंक
3 म्हाडाची सोडत जाहीर, २१७ जणांचे गृहस्वप्न साकार
Just Now!
X