News Flash

एका वर्षात मुंबईत २.८७ लाख वाहनांची भर; एकूण वाहनांची संख्या ३६.४ लाख

गेल्या एका वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर १.८ लाख दुचाकींची भर पडली आहे

(संग्रहित छायाचित्र)

एकीकडे मुंबईतील रस्त्यांवरील जागा कमी होत चालली असताना वाहनांची संख्या मात्र दिवसेंवस वाढत चालली असल्याचं चित्र आहे. गेल्या एका वर्षात मुंबईत २.८७ लाख वाहनांची भर पडली आहे. यामध्ये दुचाकी, कार, रिक्षा आणि टॅक्सींचाही समावेश आहे. महापालिकेच्या मदतीने करण्यात आलेल्या पर्यावरण स्थिती अहवालातून (ESR) ही माहिती समोर आली आहे.

मार्च २०१९ पर्यंतची आकडेवारी पाहता मुंबईतील वाहनांची संख्या एकूण ३६.४ लाख इतकी आहे. गेल्या एका वर्षात वाहनांच्या संख्येत तब्बल ७.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा २.८७ लाख इतका आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या दुचाकींची आहे. गेल्या एका वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर १.८ लाख दुचाकींची भर पडली आहे. यानंतर कार, एसयुव्ही आणि इतर वाहनांचा समावेश आहे. २०१८ च्या तुलनेत इतर वाहनांची संख्या ६८ हजार २०९ ने वाढली आहे.

सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये टॅक्सीच्या संख्येत घट झाली असून ८४१५ ने संख्या कमी झाली आहे. तर दुसरीकडे रिक्षा आणि बसेसच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. रिक्षाच्या संख्येत ३० हजार ६२२ ने तर बसेसच्या संख्येत १२१२ ने वाढ झाली आहे.

तज्ञांच्या मते शहरातील वाढती वाहतूक समस्या दुचाकींच्या संख्येत वाढ होण्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं. “गेल्या एका वर्षात शहरातील वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. मेट्रोचं बांधकाम, रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर निर्माणधीन कामांमुळे वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांना कारमधून प्रवास करत अडकून पडण्यापेक्षा दुचाकीवरुन प्रवास करणं जास्त सोयीस्कर वाटत आहे. मी अशा अनेक लोकांना पाहिलं आहे ज्यांनी कार वापरणं बंद केलं असून कामावर जाण्यासाठी दुचाकी किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत आहेत,” असं वाहतूक नियोजक आणि मुंबई मोबिलिटी फोरमचे सदस्य विवेक पै यांनी सांगितलं आहे.

दरम्यान शहरातील रस्त्यावर असणाऱ्या ३६.४ लाख वाहनांमध्ये दुचाकींची संख्या सर्वात जास्त ५८.६१ टक्के इतकी आहे. यानंतर चारचाकी, एसयुव्हीचा क्रमांक आहे. तसंच रस्त्यांवर टॅक्सींची संख्या ३.२८ टक्के, रिक्षा ५.८४ टक्के आणि बसेसची संख्या ०.४४ टक्के इतकी आहे. याशिवाय इतर वाहनांचीही नोंद आहे. यामध्ये २.०४ टक्के माल वाहने, ०.०२ टक्के ट्रॅक्टर/ट्रेलर, आणि इतर वाहनांची संख्या ०.१० टक्के आहे.

एलपीजी आणि सीएनजी वापरणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एलपीजी आणि सीएनजी वापरणाऱ्या टॅक्सींच्या संख्येत २.३ टक्के तर रिक्षांच्या संख्येत १.७३ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ २६ टक्के इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 6:35 pm

Web Title: 2 87 lakh vehicles increased in mumbai makes total 36 4 lakh environment status report sgy 87
Next Stories
1 भाजपा प्रवेशाच्या चर्चेबाबत काँग्रेस नेते मिलिंद देवरा म्हणतात…..
2 शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
3 मुंबई – खार रोडवर इमारतीचा भाग कोसळला, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
Just Now!
X