वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई :२२ दिवसांच्या बाळाच्या मांडीच्या भागातील दोन सेंटीमीटर लांबीची सुई काढण्याची शस्त्रक्रिया वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. पनवेलमधील खासगी रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे जन्मानंतर देण्यात आलेल्या लसीकरणादरम्यान ही सुई तुटून बाळाच्या मांडीमध्ये अडकली होती.

पनवेलमध्ये राहणाऱ्या आस्था पाष्टे यांची प्रसूती पनवेलमधील खासगी रुग्णालयात सुमारे महिनाभरापूर्वी झाली. जन्मलेल्या बाळाला लगेचच तिसऱ्या दिवशी मांडीमध्ये लस टोचण्यात आली. बाळ आणि आई घरी गेल्यानंतर जवळपास २० दिवसानंतर लस दिलेल्या डाव्या मांडीला सूज येऊन बाळाला ताप येऊ लागला. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पाष्टे कुटुंबीयांनी बालरोगतज्ज्ञांकडे उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी केलेल्या तपासण्यामध्ये बाळाच्या डाव्या बाजूच्या पाश्र्वभागातील सांध्यांमध्ये हाडांना संसर्ग झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढील उपचारासाठी पाष्टेंनी बाळाला वाडिया रुग्णालयामध्ये दाखल केले.

क्ष-किरण तपासणीमध्ये बाळाच्या डाव्या पाश्र्वभागाच्या सांध्यामध्ये काही वस्तू असल्याचे आढळून आले. त्यानंतर केलेल्या सीटी स्कॅन तपासणीमध्ये लसीकरणादरम्यान वापरण्यात आलेली सुई असल्याचे निश्चित झाले. बाळाच्या मांडीमध्ये सुई गेली कशी आणि तब्बल २२ दिवस कल्पनाही न आल्याचा पालकांसाठी मोठा धक्का होता. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून सुई काढून टाकली.

ऑस्टिओमायलायटिस या हाडांना झालेल्या संसर्गासाठी उपचार करताना सीटी स्कॅन तपासणीमध्ये बाळाच्या डाव्या मांडीच्या वरील भागात सुई असल्याचे निष्पन्न झाले. लसीकरणादरम्यान तुटलेली सुई १९ दिवस बाळाच्या शरीरात होती. बाळाला कदाचित ती टोचत नसेल किंवा ते वेदना व्यक्त करू शकत नसावे. अखेर शस्त्रक्रिया करून ही सुई काढण्यात आली.  सी-आर्म गायडन्स लोकलायझेशन तंत्राचा वापर करून सुई काढण्यास दोन तासांचा कालावधी लागला. २ सेंटीमीटर लांबीची सुई डाव्या पाश्र्वभागाच्या सांध्याच्या प्रावरणाला चिकटली असल्याचे वाडिया रुग्णालयातील बालशल्यविशारद डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले.

वैद्यकीय सेवेमध्ये असा निष्काळजीपणा घडणे अपेक्षित नाही. रुग्णाच्या बाबतीत विशेषत: बालकांच्या बाबतीत रुग्णालयांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी वेळेत निदान करून ही सुई काढल्याने बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.