News Flash

चंदा कोचर यांचे आठ बनावट ईमेल!

आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या नावे आठ बनावट मेल-आयडी बनवून ग्राहकांना

| November 15, 2013 05:03 am

आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या नावे आठ बनावट मेल-आयडी बनवून ग्राहकांना फसविण्याच्या तयारीत असलेल्या नायजेरियन नागरिकाला मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी अटक केली. या प्रकरणी मदत केल्याच्या आरोपावरून बंगळुरू येथील एका डेटा कार्ड विक्रेत्यालाही अटक करण्यात आली आहे. संबंधित मेलवर विश्वास ठेवून ग्राहकांनी सुदैवाने रक्कम वळती न केल्याने कोणाची फसवणूक झालेली नाही.
आपल्या नावे अज्ञात इसमांनी जीमेल, लाईव्ह तसेच १६३ डॉट कॉम या साइटद्वारे काही बनावट मेल आयडी तयार केल्याची माहिती कोचर यांना काही ग्राहकांकडून समजली. काही ग्राहकांनी या मेल आयडीशी संपर्क साधला असता डेव्हिड गोल्डमन हा इसम मृत झाला असून त्याच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात ५० कोटी जमा आहेत. ही रक्कम त्याच्या वारसाला वळती करायची आहे. याबाबतची कागदपत्रेही सोबत पाठविण्यात आली. आपणच वारसच आहात अशा आशयाचा मेल पाठवून सुरुवातीला काही रक्कम मागण्यात आली. आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षांच्याच नावे थेट मेल आल्यामुळे अनेक ग्राहकांनी वस्तुस्थिती तपासून पाहण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. तेव्हा अशा प्रकारचा कुठलाही मेल आयडी तयार करण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले. परंतु या तक्रारींमध्ये वाढ झाल्यामुळे बँकेने या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपास केल्यानंतर कोचर यांच्या नावे आठ बनावट मेल आयडी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
बनावट मेल आयडी बनविण्यासाठी ‘एमटीएस’च्या डेटाकार्डचा वापर करण्यात आला होता. हे डेटाकार्ड बंगळुरू येथून विकण्यात आले होते आणि ते तेथेच रिचार्ज करण्यात आले होते. वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस वरिष्ठ निरीक्षक नंदकिशोर मोरे, निरीक्षक सुनील घोसाळकर आणि सहायक निरीक्षक प्रकाश वारके यांच्या पथकाने तपास करून हे कार्ड विकणाऱ्या रतीश करगप्पा याला अटक केली. संबंधित कार्ड नोकराच्या नावे एका अज्ञात इसमाला विकल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा कार्ड वापरीत असलेल्या इफे चक्स एन्डु लिडल्ड या नायजेरियन नागरिकाला अटक केली. चंदा कोचर यांच्या नावे बनविण्यात आलेल्या बनावट आयडीद्वारे अनेकांना मेल पाठविल्याचे त्याने सांगितले.
आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटवरून त्याने ग्राहकांचा तपशील मिळविला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या मेलला कुठल्याही ग्राहकाने प्रतिसाद दिलेला नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 5:03 am

Web Title: 2 held for creating fake email ids of icici bank ceo chanda kochhar
Next Stories
1 घरफोडी करणाऱ्या आरोपीस जम्मू-काश्मीरमधून अटक
2 ५५ लाखांची फसवणूक
3 एचआयव्ही रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण
Just Now!
X