पनवेल – ठाणे लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी तुषार जाधव याची १२ जून रोजी पहाटे पाचच्या सुमारास चोरटय़ांनी घणसोली स्थानकात गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली होती. तुषार याच्या हत्येच्या तब्बल सहा दिवसानंतर मंगळवारी रात्री दोन्ही चोरटय़ांना वाशी रेल्वे पोलिस व स्थानिक गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. तुषारचा खून हा चोरीच्याच उद्देशाने केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
धक्कादायक बाब म्हणजे या चोरटय़ांना वाशी आणि सानपाडा रेल्वेस्थानक परिसरातूनच अटक करण्यात आले. याच परिसरात ते मोकाट फिरत असल्याचे समोर आले आहे. चोरटय़ांनी घटनेच्या एक दिवस आधी चाकू खरेदी केला होता. हा त्यांचा चोरीचा पहिलाच प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. जयंता बाबुल सोम उर्फ राजा हिन्दू व माधव नकुल सरकार अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. मूळचे पाश्चिम बंगाल मधील रहिवाशी असलेले  दोघे ही नवी मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात राहत होते.  या प्रकरणी पनवेल ते घणसोली रेल्वे स्थानकातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता. मानसरोवर स्थानकात दोन तरूण लगेज डब्ब्यात चढले होते. तर घणसोली रेल्वे स्थानकात लोकल दाखल होत असतानाच त्यांनी उडी मारून पळ काढल्याचे आढळले. फुटेजच्या माध्यामातून आरोपींचे छायाचित्र प्राप्त करून या खूनाच्या तपासासाठी रेल्वे मध्य परिमंडळाच्या पोलिस उपायुक्त रूपाली अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वाशी रेल्वे पोलिस, कुर्ला रेल्वे पोलिस आणि वडाळा रेल्वे पोलिसांचे पथक तयार केले होते. मिळालेल्या माहिती नुसार सानपाडा परिसरातून मंगळवारी रात्री जयंता सोमला अटक केली. यानंतर  आरोपी माधव याला ताब्यात घेतले.