मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे करोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, मुंबईत आणखी दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यातील एका डॉक्टरला आयसीयू बेडसाठी तब्बल दोन दिवस प्रतीक्षा करावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चिता कॅम्प (ट्रॉम्बे) येथील ५१ वर्षीय डॉक्टरला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांचा २६ मे रोजी लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अंधेरी पूर्व येथील एका आयुर्वेदिक डॉक्टरचा करोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे. गुरूवारी दुपारी सौमेय्या रुग्णालयात ही घटना घडली. या दोन मृत्यूमुळे मुंबईतील डॉक्टरांच्या बळींची संख्या पाच इतकी झाली आहे.

‘हिंदुस्थान टाईम्स’नं हे वृत्त दिलं आहे. ट्रॉम्बे येथील डॉक्टरला २४ मे रोजी त्यांच्या मुलाने सायन रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आयसीयू बेड उपलब्ध नव्हता. प्रतीक्षा यादीत (वेटिंग लिस्ट) त्यांचा ४१ वा क्रमांक होता. त्यामुळे जास्त रुग्णांची असलेल्या अपघात विभागात राहावं लागलं. त्यांच्या मुलानं यासंदर्भात माहिती दिली. “बेडच्या कमरतेमुळे रुग्णांना दोन बेडच्या मध्ये फरशीवर झोपावं लागलं. २५ मे रोजी दुपारी वडिलांना कोविड कक्षात दाखल करण्यात आलं. तोपर्यंत करोनाचा संसर्ग वाढलेला होता. वडिलांना बेड देण्यात यावा, अशी विनंती मी डॉक्टरांना केली. पण, माझ्या वडिलांसारखे अनेक रुग्ण आहेत. कुणाकुणाला बेड द्यायचा, असं उत्तर डॉक्टरांनी दिलं,” अशी माहिती त्या मुलानं दिली.

या घटनेविषयी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनीही स्पष्टीकरण दिलं. “करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचा सामना करण्यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या वाढवून ४३० करण्यात आली आहे. मुंबई शहरात सर्वाधिक रुग्ण आमच्याकडे येत आहेत. काही प्रमाणात हे कोविड रुग्णालयच झालं आहे. आम्हाला करोनाग्रस्त आणि करोना नसलेले अशा दोन्ही रुग्णांवर उपचार करावे लागत आहे,” असं भारमल म्हणाले.