मुंबईत झालेल्या कमला मिल अग्नितांडवातील आणखी एक शोकांतिका समोर आली आहे. या दुर्घटनेत अमेरिकास्थित दोन भावंडांचा करुण अंत झाला आहे. आग लागली तेव्हा ‘वन अबव्ह’ पबमधून बाहेर पडलेल्या या दोन भावंडांनी अडकलेल्या आपल्या आत्याला वाचवण्यासाठी पुन्हा पबमध्ये धाव घेतली आणि आत्यासह या दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला.

धैर्य ललानी (वय २६) आणि विश्व ललानी (वय २३) अशी या भावांची नावे आहेत. पबमधील वॉशरुमजवळ या दोघांचे मृतदेह आढळून आले. या ठिकाणी कुठलीही खिडकी किंवा बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. त्याचबरोबर इतर ठिकाणी आढळून आलेल्या अनेक मृतदेहांपैकी या दोन भावांची आत्या प्रमिला यांचा मृतदेहही आढळून आला. यामुळे ललानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सकाळी या तिघांवर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी धैर्य आणि विश्व यांचे वडिल जयंत ललानी एकदम सुन्न अवस्थेत होते.

धैर्य आणि विश्व हे दोघे भाऊ अमेरिकेत स्थायिक असून ते दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत आपल्या नातेवाईंकांच्या लग्नासाठी आले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री त्यांची आत्या प्रमिला यांनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला प्रमिला यांना जायची इच्छा नव्हती मात्र, भाचे अमेरिकेहून आले आहेत तेव्हा त्यांचा आग्रह न मोडण्याचे नातेवाईकांनी त्यांना सांगितल्याने प्रमिला पार्टीला गेल्या.

दरम्यान, गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याचा दरम्यान पबला आग लागल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या दोघा भावांनी सहजरित्या बाहेर धाव घेतली. त्यानंतर त्यांना आठवले की त्यांची आत्या त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे त्यांनी आत्याला शोधण्यासाठी पुन्हा पबमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आगीने वेढलेल्या पबमध्ये ते दोघेही आपल्या आत्याला वेड्यासारखे शोधत होते. अखेर वॉशरुमजवळ त्यांना त्यांच्या आत्याचा मृतदेह इतर लोकांसह आढळून आला. त्यानंतर त्यांच्या दोघा मित्रांनी आत्याला घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

आत्याला वाचवण्यासाठी गेलेला एक भाऊ आगीमुळे वॉशरुममध्ये अडकून पडला. तो परतलाच नाही. त्यानंतर दुसरा भाऊ देखील आत गेला तो परतलाच नाही, असे त्यांच्या एका मित्राने सांगितले. त्यानंतर काही तासांनंतर हे दोघे भाऊ आणि त्यांची आत्या हे तिघेही मृतावस्थेत सापडले.