राज्यातील जलसंकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. उन्हाळ्याला आणखी चार महिने असताना धरणांमध्ये फक्त ५३ टक्के पाणीसाठा उरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्क्यांनी कमी आहे.

या पाणीटंचाईमुळे राज्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या ७१५ वर गेली आहे. गेल्या वर्षी याच काळात अवघे ८९ टँकर सुरू होते. या पाण्यावरून आता राजकारण पेटले असून रोज वाढत असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईचे चटके राज्यभरात ठिकठिकाणी बसू लागले आहेत. राज्यातील मोठे, मध्यम व लघू अशा सर्व प्रकल्पांमध्ये मिळून अवघा ५३.९१ टक्के पाणीसाठाच उरला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ७३.३२ टक्के पाणीसाठा राज्यातील प्रकल्पांमध्ये होता. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के कमी पाणी यंदा महाराष्ट्रातील लोकांना उपलब्ध असल्याचे चित्र असून पाणीकपातीचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत.

टँकरच्या संख्येवरून सचिन सावंत यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. २०१४ साली राज्यात ७०.२ टक्के म्हणजे यंदापेक्षा कमी पाऊस पडला होता. त्या वेळी १७ नोव्हेंबर २०१४ च्या आकडेवारीनुसार राज्यात केवळ ७१ टँकर सुरू होते. २०१५ साली राज्यात त्यापेक्षा कमी म्हणजेच ५९.४ टक्के पाऊस पडला. १६ नोव्हेंबर २०१५ च्या आकडेवारीनुसार त्या वेळी ६९३ टँकर राज्यात सुरू होते. यातूनच जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत असून या योजनेवर खर्च झालेले ७ हजार ७८९ कोटी रुपये जलयुक्त शिवारच्या खड्डय़ांमध्ये मुरले का? असा सवाल सावंत यांनी केला आहे. भाजपने पलटवार करत सचिन सावंत यांनी आपली मानसिक स्थिती तपासून घ्यावी, असा टोला लगावला आहे. टँकरची आकडेवारी मांडताना मे महिन्यातील अखेरच्या आठवडय़ातील टँकरची आकडेवारी सावंत यांनी घेतली असती, तर त्यांच्याच सरकारचे पितळ उघडे पडले असते, असा टोला भाजपने लगावला आहे.