‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या अग्रगण्य केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या प्रवेश परीक्षेच्या एकूण परीक्षार्थीमध्ये मुलींचे प्रमाण अवघे २० टक्के इतकेच आहे. अर्थात गेल्या वर्षी २८ हजार मुलींची जेईई-अ‍ॅडव्हान्सकरिता निवड झाली होती. ही संख्या यंदा दोन हजारांनी वाढली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल.
आयआयटी प्रवेशाकरिता जेईई ही सामाईक प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स आणि जेईई-अ‍ॅडव्हान्स या दोन टप्प्यात घेतली जाते. जेईई-मेन्समधून निवडक १.५६ लाख विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या टप्प्यातील जेईई-अ‍ॅडव्हान्स या परीक्षेकरिता केली जाते. त्यात यंदा १.२६ लाख इतके मुलगे आहेत. तर मुली अवघ्या ३० हजार आहेत. त्यामुळे या वर्षीही आयआयटीत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींचा टक्का कमीच राहणार आहे. गेल्या वर्षी १.२४ लाख मुलगे तर २८,००० हजार मुलींनी जेईई-अ‍ॅडव्हान्स दिली होती. मुलींचा आयआयटीतील टक्का वाढावा यासाठी त्यांच्याकडून अनुसूचित जाती-जमातीतील व दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणे १००० रुपयेच परीक्षा शुल्क घेतले जाते. उर्वरित खुल्या गटातील मुलांकडून २००० रुपये शुल्क घेतले जाते. तर दुबईसारख्या परदेशातील परीक्षा केंद्रावरून जेईई-अ‍ॅडव्हान्स देणाऱ्यांकडून आयआयटी २२० डॉलर इतके शुल्क घेते.

परीक्षा केंद्रांत वाढ
यंदा जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या परीक्षा केंद्रांची संख्या १६ने वाढविण्यात आली आहेत. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाटय़ाला तीन परीक्षा केंद्रे आली आहेत. यंदा मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या परीक्षा केंद्रांसह औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणीही परीक्षा केंद्रे असणार आहेत.