News Flash

मांसाहारालाही दुष्काळ झळा

दुष्काळग्रस्त भागातील २० टक्के कुक्कुटपालन केंद्रे बंद पडली असून त्यामुळे कोंबडय़ांची संख्या कमी झाली आहे.

मांसाहारालाही दुष्काळ झळा
दुष्काळग्रस्त भागातील २० टक्के कुक्कुटपालन केंद्रे बंद पडली असून त्यामुळे कोंबडय़ांची संख्या कमी झाली आहे.

राज्यातील २० टक्के कुक्कुटपालन व्यवसाय बंद झाल्याने कोंबडय़ांची टंचाई; चिकनचे दर वाढण्याची भीती राज्यावर ओढवलेल्या दुष्काळ संकटामुळे भाज्या आणि डाळींच्या किमती वाढू लागल्या असतानाच मांसाहाऱ्यांनाही नजीकच्या काळात दुष्काळाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील २० टक्के कुक्कुटपालन केंद्रे बंद पडली असून त्यामुळे कोंबडय़ांची संख्या कमी झाली आहे. पाण्याचा अभाव आणि प्रचंड उष्मा यामुळे कोंबडय़ांच्या वजनावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईतील कोंबडय़ांची आवक घटली असून मार्चच्या तुलनेत एप्रिलमधील कोंबडीचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यात येत्या काळात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
मुंबईला नाशिक, पुणे, अलिबाग, नगर, सांगली, औरंगाबाद आदी ठिकाणांहून कोंबडय़ांची आवक होते. यापैकी बहुतांश भाग सध्या दुष्काळाच्या छायेत आहे. पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने येथील सुमारे २० टक्के व्यावसायिकांनी कोंबडी उत्पादन केंद्रे बंद केली आहेत. कोंबडी उत्पादनात नाशिक देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील किन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे. मालेगावमधील माळमाथा गावातील तब्बल ५० टक्के कुक्कुटपालन केंद्रे बंद पडली आहेत.
दुसरीकडे, पाणीटंचाई आणि सध्या असलेला प्रचंड उष्मा यामुळे कोंबडय़ांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. अशा स्थितीत कोंबडय़ांना पुरसे खाद्य मिळत नसल्याने त्यांचे वजन घटू लागले आहे. एरवी बाजारात येणाऱ्या कोंबडीचे वजन साधारण २ किलो ३०० ग्रॅम असते. मात्र, सध्या ते १ किलो ८०० ग्रॅम भरत आहे. आधीच घटलेली आवक आणि त्यात कोंबडय़ांच्या वजनातील घट यामुळे चिकनचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या कुक्कुटपालन केंद्रांमधून घाऊक विक्रेत्यांना ८० ते ५० रुपये प्रति किलो दराने कोंबडय़ा मिळत आहेत. किरकोळ बाजारात त्याच कोंबडय़ा प्रति किलो १३० रुपयांहून अधिक दराने मिळू लागल्या आहेत.

कुक्कुटपालन व्यवसाय गेल्या १५ डिसेंबरपासून तेजीत आहे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही तेजी ओसरते. पण दुष्काळाच्या झळांमुळे कोंबडी उत्पादनावर परिणाम झाला आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये कोंबडय़ांच्या प्रति किलो दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दीपक चव्हाण, शेतमाल बाजारभाव विश्लेषक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2016 2:35 am

Web Title: 20 percent poultry business close in maharashtra
Next Stories
1 ..पुन्हा एकदा रस्ता खचला
2 फेडरिको सोपेना गुसी यांना नव्वदीत भारतीयत्व
3 महालक्ष्मी जंक्शनवरील वाहनांची कोंडीतून सुटका
Just Now!
X