ठाण्यातील मानपाडा येथील संकेत विद्यालयातील २० विद्यार्थ्यांना चॉकलेट्स मधून विषबाधा झाल्याचा प्रकार आज सकाळी घडला. शाळेत नववीच्या वर्गात शिकणा-या विद्या पाठारे (वय १४ वर्षे) या विद्यार्थीनीने आपल्या वाढदिवसानिमित्त वाटलेल्या चॉकलेट्समधून ही विषबाधा झाली असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना माजिवडे येथील टायटन रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर २० विद्यार्थ्यांपैकी ४ जणांना ताबडतोब घरी सोडण्यात आले असून १६ विद्यार्थ्यांवर रूग्णालयातच उपचार सुरू आहेत. विद्या पाठारे या विद्यार्थीनीने शाळेपासून ५० मीटर अंतरावर असलेल्या ‘राम आवास भानुशाली’ या दुकानातून अॅलपेनलिबे आणि वऐलेनटाईन या दोन चॉकलेट्सची पाकीटे विकत घेतली होती. चॉकलेट्स वाटण्यात आली तेव्हा वर्गात एकूण ६५ विद्यार्थी उपस्थित होते. परंतू ‘वॅलेंटिनो’ ही चॉकलेट्स खाल्लेल्या २० विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्यानंतर त्यांचे वाटप थांबवण्यात आले आणि वि्द्यार्थ्यांना उपचारासाठी ताबडतोब टायटन रूग्णालयात हलवण्यात आले. औषध विभागाने चॉकलेट्सचे नमुने घेतले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.