मालवाहतूक क्षेत्रासह उद्योगांचे सुमारे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान

आपल्या विविध मागण्यांसाठी वाहतूकदारांनी शुक्रवारपासून पुकारलेला बेमुदत संप शनिवारीही सुरूच राहिल्याने वाहतूक क्षेत्राबरोबर एकूणच सर्व क्षेत्रांचे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने केला. या संपात फळभाज्या, दूधाची वाहतूक करणाऱ्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. मात्र संपाची धार अधिक तीव्र करण्यासाठी सोमवारपासून त्यांनाही संपात घेण्याचा विचार संघटनेकडून केला जात आहे.

डिझेलवरील केंद्र व सरकारचे कर घटवावेत, टोल पद्धतीत सुधारणा करावी, थर्ड पार्टी इश्युरन्सच्या हफ्त्यामध्ये पारदर्शकता आणावी यासह अन्य काही मागण्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसकडून करण्यात आल्या आहेत. सरकारकडून या मागण्यांना दाद दिली जात नसल्याने संघटनेकडून २० जुलैपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. संपात देशभरात ९३ लाख ट्रक सहभागी झाले असून त्यात राज्यातील १६ लाख वाहनांचा समावेश आहे. ट्रक, टेम्पोबरोबरच खासगी बसही यात सामील आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला जात असतानाच दुसऱ्या दिवशीही संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा उद्योग क्षेत्राबरोबर अन्य क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. पहिल्या दिवशी वाहतूक उद्योग क्षेत्राचे चार हजार कोटी रुपये नुकसान झाले असतानाच दुसऱ्या दिवशी हाच आकडा आठ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. यात अत्यावश्यक सेवा सोडता गोदी, रिफायनरी, कोळसा, सिमेंट, ग्रॅनाईट, स्टील इत्यादींची वाहतूक थांबली. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाचे विविध करही बुडाले. त्यामुळे वाहतूक उद्योग क्षेत्राबरोबर अन्य क्षेत्रांचे मिळून एकूण २० हजार कोटी रुपये नुकसान झाले आहे. या संपात अत्यावश्यक सेवांचा समावेश नाही. मात्र सोमवारपासून त्यांनाही संपात सामील करण्याचा विचार संघटनांकडून केला जात आहे.

संपामुळे वाहतूक व अन्य उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर संप अधिक तीव्र केला जाईल. सोमवारपासून अत्यावश्यक सेवांनाही संपात सामील करण्यासंदर्भात आम्ही विचार करत आहोत.     – बाल मल्कित सिंग, अध्यक्ष,ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस कोअर कमिटी