News Flash

मुंबईत जुलै अखेर २० हजार खाटा- आयुक्त चहेल

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २९ दिवसांवर, आज १५०० खाटा रिकाम्या

संदीप आचार्य 
मुंबईत करोनाचे रुग्ण दोन लाखांपर्यंत वाढले तरी रुग्णालयात पुरेशा खाटा असतील अशी व्यवस्था महापालिकेने केली असून जुलै अखेरीस पालिकेकडे २० हजार बेड तयार असतील व यात अतिदक्षता विभागासाठी दोन हजाराहून अधिक खाटांची व्यवस्था असेल असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.

मुंबईत आजच्या दिवशी करोनाचे सुमारे ६० हजार रुग्ण असले तरी यातील प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची गरज असलेल्यांची संख्या कमी आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास पालिकेकडे आजच्या दिवशी सर्व रुग्णालयात मिळून ११,५४८ खाटा उपलब्ध आहेत तर ९५४५ रुग्ण दाखल आहेत. तर सुमारे १५०० खाटा मोकळ्या आहेत. अतिदक्षता विभागात खाटा मिळत नाही अशी तक्रार होती परंतु आजच्या दिवशी आमच्याकडे आयसीयूच्या ११६३ खाटा असून त्यापैकी २१ खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजन ची व्यवस्था असलेल्या ५६१२ खाटा असून आजच्या दिवशी यातील ४३१५ खाटांवर रुग्ण दाखल असून १२९७ खाटा रिकाम्या आहेत.

“काही तज्ज्ञ मुंबईतील करोना रुग्णसंख्या वाढेल अशी चिंता व्यक्त करत आहेत. तसेच पावसाळ्यातील साथीचा आजारांचा विचार करून आम्ही जुलै अखेरीस मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी २० हजार खाटांची व्यवस्था करत आहोत. यात आयसीयूतील खाटांची संख्या सध्याच्या ११६३ वरून दुप्पट झालेली असेल. मुंबईत आज घडीला रुग्ण वाढीचा वेग २९ दिवसांवर गेला असून याचा विचार करता आम्ही जे जम्बो खाटांचे जाळे उभे करत आहोत त्याची गरज नसल्याची टीका करणारेही आता दिसत आहेत”, असे सांगून आयुक्त चहेल म्हणाले “यापुढे मुंबईत कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात खाट मिळत नाही अथवा खाट मिळण्यासाठी त्याला फिरावे लागत आहे, असे चित्र दिसणार नाही. खासगी रुग्णालयातील खाटांव्यतिरिक्त ३० जूनपर्यंत आमच्याकडे १५ हजार खाटा तयार असतील तर जुलै अखेरपर्यंत २० हजार खाटा महापालिका रुग्णालयात असतील”, असे आयुक्तांनी सांगितले. यात गोरेगाव येथे ३००० खाटा, बीकेसीत २००० खाटा, डोम व रेसकोर्स येथे १४०० खाटा तर मुलुंड येथे २००० खाटा आणि दहिसर येथे २००० खाटा अशा १०,००० खाटांची व्यवस्था झालेली असेल.

“रुग्ण व्यवस्थेचेही व्यवस्थापन नव्याने वॉर्ड स्तरावरील नियंत्रण कक्षातून करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून सर्व चाचण्यांचे अहवाल सकाळी सात वाजेपर्यंत वॉर्ड मधील नियंत्रण कक्ष मध्ये येतात. तेथून रुग्णांना संपर्क साधून पालिकेच्या रुग्णवाहिका मधून रुग्णाला थेट रुग्णालयात दाखल केले जाते. दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईतील सर्व करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केलेले असते. यासाठी सर्व प्रयोगशाळांना त्यांच्याकडील चाचणी अहवाल प्रथम पालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेच्या २४ वॉर्ड मधील नियंत्रण कक्षमधील डॉक्टर संबंधित रुग्णाला तो लक्षणे असलेला असल्यास माहिती घेऊन घरी किंवा पालिकेच्या क्वारंटाईन केंद्रात दाखल होण्याची व्यवस्था करतो. रुग्ण पॉझिटिव्ह असून ताप तसेच कोमॉर्बीड असल्यास त्याप्रमाणे खाजगी वा पालिका रुग्णालयात दाखल केले जाते. यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये पुरेसे कर्मचारी तसेच १० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली असून आता रुग्णालयात खाट मिळत नाही, अशी तक्रार यापुढे कोणालाही करता येणार नाही”, असे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 4:33 pm

Web Title: 20 thousand hospital beds available in mumbai by the end of july commissioner chahal scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अस्थींचं गंगेत विसर्जन
2 गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी मोठा निर्णय
3 मुंबईतील कुर्ला भागात इमारतीचा भाग कोसळला
Just Now!
X