रायगड लोकसभा मतदारसंघात राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना अवघ्या दोन हजार मतांनी विजयाने चकवा दिला असताना या मतदारसंघात तब्बल २० हजार १२९ मतदारांनी ‘नोटा’चे (वरीलपैकी कोणीही नाही) बटण दाबल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात तब्बल १५ मतदारसंघात दहा हजार पेक्षा अधिक नोटा मतांची नोंद झाली आहे.
नंदूरबार, पालघर मतदारसंघात ही संख्या २१ हजारपेक्षा अधिक आहे तर त्याखालोखाल गडचिरोली (२०,०६७२) आणि परभणीत (१७,५०२) यांचा क्रमांक लागतो. नोटा म्हणजेच यापैकी कोणताही उमेदवार नाही, असे मत नोंदवण्याची सुविधा निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली आणि त्याचा मतदारांनी पुरेपूर उपयोग केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात तब्बल १४ हजार २१३ मतदारांना एकही उमेदवार मतदान करण्याजोगा वाटला नाही. या मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी झाल्या.
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित (भाजप) आणि माणिकराव गावित (काँग्रेस) यांच्यातील चुरशीच्या लढतीत २१ हजार १७८ ‘नोटा’ मते नोंदली गेली. पालघरमध्ये २१ हजार ७२६ मतदारांना कोणीही योग्य उमेदवार सापडला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यातही १२ हजार ३९३ मतदारांनी आपली नोटाद्वारे नाराजी नोंदविली. सहा हजारपेक्षा अधिक मतदारांनी नोटाचा वापर केलेले मतदारसंघ पुढीलप्रमाणे : शिरूर (११,१३६), मुंबई उत्तर-पश्चिम (१०,६०६), सातारा (१०,५८९), दक्षिण मध्य मुंबई (९५३९), नाशिक (८९१६), दक्षिण मुंबई (८६१५), उत्तर मुंबई (८५१५), शिर्डी (८२४४), अहमदनगर (७४६८), कोल्हापूर (७००१), चंद्रपूर (६३८०), पुणे (६४१२), अकोला (६२०६) आणि सांगली (६११०).