चतुर्थ श्रेणी कामगारांची संख्या अधिक

मुंबई :  मुंबई पालिकेच्या विविध विभागांतील सुमारे पाच हजार कर्मचारी आतापर्यंत करोनाबाधित झाले असून त्यापैकी २०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

मुंबई पालिकेत साधारण लाखभर कर्मचारी काम करतात. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पालिकेच्या आरोग्य विभागासह विविध विभागांतील कर्मचारी बाधित झाले आहेत. ही संख्या सतत वाढतच असून, करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्याबरोबरच अधिकारी, अभियंते, विविध विभागातील कर्मचारी, शिपाई यांना देखील करोनाशी संबंधित कामे देण्यात आली होती.

गेल्या सहा महिन्यांत पालिकेच्या विवध विभागातील कर्मचारी बाधित झाले आहेत. तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कर व संकलन विभाग, घनकचरा विभाग, आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा विभाग अशा विविध विभागातील अधिकारी, कामगार व कार्यालयीन कर्मचारी यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

आतापर्यंत पाच हजार कर्मचारी बाधित : कोविडमुळे आतापर्यंत पालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ‘इंडो- अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉर्मस’च्या नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात दिली. तर पाच हजार कर्मचारी आतापर्यंत बाधित झाल्याची माहिती त्यांनी दिली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत १३४ कर्मचाऱ्यांचा करोनाने बळी घेतला होता. तर गेल्या १५ दिवसातच ही संख्या २०० वर गेली आहे.

५० लाखांचा विमा नाहीच!

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत कोविड १९ शी सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढण्यात आला आहे. त्याअंतर्गत नुकसान भरपाईसाठी पालिकेने कर्मचाऱ्यांसाठी अर्ज केले असता विमा कंपनीने केवळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचेच अर्ज मंजूर केले आहेत.