News Flash

बनावट कागदपत्रांच्या आधारे २०० पिस्तुलांची विक्री

येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तब्बल २०० पिस्तुलांची विक्री झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

| July 9, 2015 04:31 am

येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तब्बल २०० पिस्तुलांची विक्री झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. लिपिक इम्तियाज मणियार याला ताब्यात घेण्यात आले असून यामागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे.
पंजाब येथील फिरोजपूरमधील जिल्हा न्यायाधीशांच्या बनावट स्वाक्षरीचे परवानगीपत्र आणि बनावट ना-हरकत प्रमाणपत्र एका टोळीने तयार केले होते. त्याआधारे या टोळीचा अंबरनाथ ते पंजाब असा पिस्तुले खरेदी-विक्रीचा उद्योग सुरू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने तब्बल २०० पिस्तुले विकणारा ऑर्डनन्स फॅक्टरीतला लिपिक इम्तियाज मणियार याला अंबरनाथ पोलीस व पंजाबच्या पोलिसांनी अटक केली असून त्याला पुढील चौकशीसाठी पंजाबमध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीच्या सुरक्षेची लक्तरे चव्हाटय़ावर आली आहेत. पंजाब येथील फिरोजपूर येथील जिल्हा न्यायाधीशांच्या बनावट स्वाक्षरीचे परवानगीपत्र आणि बनावट ना-हरकत प्रमाणपत्र एका टोळीने तयार केले होते. या बनावट कागदपत्रांच्या आधारे अंबरनाथमधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील पिस्तुल नेण्यात येत होते. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी फिरोजपूर येथील गुरूहर सहाय व दिनेश पलटा यांना अटक केली होती. या प्रकरणी फिरोजपूर येथील कॅन्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरीतील इम्तियाज मणियार याच्या मदतीने फॅक्टरीतील सुमारे २०० पिस्तुले मिळवून ती बाहेर विकल्याचे त्या दोघांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले. तसेच २००६ ते २००८ या काळात गुरूहर सहाय व दिनेश पलटा यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पिस्तुले दिल्याचेही पंजाब पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्यामुळे कॅन्ट पोलीस ठाण्याचे निरीक्षक अवतार सिंग यांनी अंबरनाथ पोलिसांच्या मदतीने मणियारला पकडले. मणियार याला पुढील चौकशीसाठी पंजाब येथे नेण्यात आले असून या प्रकरणात या टोळीत अन्य सदस्य असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुरक्षा रक्षकांना गुंगारा?
मणियार याच्याकडून तब्बल २०० रिव्हॉल्वर घेण्यासाठी वारंवार येणाऱ्या पलटा याच्यावर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या सुरक्षारक्षकांना संशयदेखील कसा आला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील अधिक तथ्य मणियार याच्या चौकशीनंतरच समोर येऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2015 4:31 am

Web Title: 200 pistol sale on the basis of fake papers
टॅग : Pistol
Next Stories
1 शिवराज यांनी पिंडदान योजना सुरू करावी- दिग्विजय सिंह
2 लेप्टो मृत्यूंचे गूढ कायम
3 मोटरमनची हलगर्जीच चर्चगेट अपघातास कारणीभूत
Just Now!
X