07 July 2020

News Flash

दुसऱ्या टप्प्यात २०० रस्त्यांची चौकशी

आता अजोय मेहता यांनी तब्बल २०० रस्त्यांच्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आता अजोय मेहता यांनी तब्बल २०० रस्त्यांच्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

कंत्राटदारांचा कोटय़वधींचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता
मुंबईमधील ३४ रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे उघडकीस आल्यामुळे आता पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईमधील तब्बल २०० रस्त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या रस्त्यांची तीन महिन्यांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील चौकशीमध्ये रस्ते कामात झालेल्या कोटय़वधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे असून या चौकशीमुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.
नालेसफाईप्रमाणेच रस्ते कामांमध्येही घोटाळा होत असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना गोपनीय पत्र पाठवून केली होती. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उड्डाणपूल विभागाचे प्रमुख अभियंता शीतलाप्रसाद कोरी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने चौकशीसाठी पहिल्या टप्प्यात ३४ रस्त्यांची निवड केली. या रस्त्यांच्या कामात आवश्यकतेपेक्षा खडीचा कमी जाडीचा थर रस्त्याखाली टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर रस्त्यासाठी वापरलेले साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याचे, तसेच काही रस्त्यांची कामे सुमारे ५० टक्के निकृष्ट दर्जाची असल्याचे निदर्शनास आले असून या रस्ते कामांमध्ये सुमारे १४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सहा कंत्राटदारांविरुद्ध पालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आता अजोय मेहता यांनी तब्बल २०० रस्त्यांच्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील चौकशीमध्ये पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आलेल्या रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व प्रमुख रस्त्यांचा समावेश असेल, असे रस्ते विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. पहिल्या टप्प्यामध्ये मरिन ड्राइव्हच्या रस्त्याचा समावेश करण्यात येणार होता. मात्र आयत्या वेळी पहिल्या टप्प्यातून तो वगळण्यात आला होता. या वेळी मात्र या रस्त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या चौकशीसाठी पथके सज्ज करण्यात आली आहेत. या पथकामध्ये दक्षता विभागातील सहा ते सात सहायक अभियंते, संबंधित प्रभागातील सहायक अभियंते आदींचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच चौकशीदरम्यान रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी कामगारही उपलब्ध करण्यात येणार आहेत. दक्षता विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात येणार आहे. सुरुवातीला रस्त्यांवर खड्डे खोदून वापरण्यात आलेल्या साहित्याचा, तसेच रस्तेबांधणीचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

काँग्रेसची लोकायुक्तांकडे धाव
मुंबई : रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांना स्थायी समितीने मंजूर केलेली पुलांची कामे तात्काळ रद्द करावी आणि घोटाळेबाजांना कामे देणारे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने थेट लोकायुक्तांकडे केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.
रस्त्यांच्या ३४ कामांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीमध्ये उघडकीस आले असून पालिका प्रशासनाने सहा कंत्राटदारांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यांपैकी जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस्ला यारी रोड आणि हँकॉक पूल, तर आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टस्ला विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील व मिठी नदीवरील पुलाचे तब्बल २२७ कोटी रुपयांचे कामे काम देण्यात आले आहे. ही कामे ३० ते ५० टक्के चढय़ा दराने देण्यात आली आहेत. ही बाब गंभीर असून या कंत्राटदारांना देण्यात आलेली कामे तात्काळ रद्द करण्याचे आणि घोटाळेबाजांना कामे देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्त एम. एल. तहलियांनी यांना पत्र पाठवून केली आहे.
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पुलांची कामे घोटाळेबाज कंत्राटदारांना देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यावेळी काँग्रेसने निषेधनाटय़ करीत बैठकीतून काढता पाय घेतला होता. आता काँग्रेसने एम. एल. तहलियांनी यांना पत्र पाठवून कंत्राटदारांना दिलेली कामे रद्द करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 1:28 am

Web Title: 200 roads inquiry in second phase
Next Stories
1 दळण आणि ‘वळण’ : तिकिटांच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी..
2 इन फोकस : गजराजाचे ‘आनंद’स्नान
3 देशभरातील कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी ‘आर्ट हब’
Just Now!
X