25 November 2017

News Flash

दोनशेची नोट दिसेना!

बँकांमध्येच दोनशेच्या नोटा अत्यल्प प्रमाणात येत आहेत.

अक्षय मांडवकर, मुंबई | Updated: September 14, 2017 4:14 AM

तीन आठवडय़ांनंतरही एटीएममध्ये तजवीज नाहीच

५०० आणि दोन हजाराच्या नोटांच्या व्यवहारात येणारी सुटय़ा पैशांची अडचण दूर करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने २०० रुपयांची नोट चलनात आणून तीन आठवडे उलटत आले आहेत. मात्र, अद्याप ही नोट बाजारात दिसत नाही. एवढेच काय, ही नोट सामावून घेण्यासाठी एटीएम यंत्रणेतील आवश्यक बदल अद्याप होऊ न शकल्याने या केंद्रांतूनही दोनशेची नोट अद्याप अवतरलेली नाही.

निश्चलनीकरणानंतर २००० व ५०० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. त्यानंतर चलनवलन अधिक सोयीचे व्हावे म्हणून २०० नोटा बाजारात आणण्याची घोषणा झाली. २५ ऑगस्टपासून त्या चलनात आणल्या गेल्या. याबरोबरच ५०चीही नवीन नोट बाजारात आली. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच २०० रुपयांची नोट चलनव्यवस्थेत येत होती. त्यामुळे तिच्याविषयी उत्सुकता होती. १०० ते ५०० रुपयांच्या मधील मूल्याची कमतरता ही नोट भरून काढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्याप बहुतांश नागरिकांपर्यंत ही नोट पोहोचलेली नाही. ही नोट सामावून घेण्यासाठी एटीएम यंत्रांतही काही तांत्रिक बदल करावे लागणार असल्याने तेथेही ही नोट अद्याप उपलब्ध झालेली नाही.

‘बँकांमध्येच दोनशेच्या नोटा अत्यल्प प्रमाणात येत आहेत. दररोज दोनशेच्या नोटेची केवळ दोन बंडले येत असल्याने प्रत्येक ग्राहकाला एकच दोनशेची नोट देण्यात येत आहे,’ असे भारतीय स्टेट बँकेच्या मंत्रालय शाखेतील ग्राहक समन्वयिका रुपाली पवार यांनी सांगितले. ग्राहकांकडून अनेकदा जास्त प्रमाणात दोनशेच्या नोटांची मागणी होत असल्याचे त्या म्हणाल्या.

‘निश्चलीकरणानंतर मुंबईतील अनेक बँकांच्या एटीएममध्ये आजही १०० रुपयांच्या नोटेचा पुरवठा सुरळीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आधी एटीएममधून शंभर रुपयांच्या चलनाचा पुरवठा सुरळीत होऊ देत मग दोनशेच्या नोटेचे पाहू,’ अशी तिखट प्रतिक्रिया दादर येथील एटीएमच्या रांगेत उभे असलेले विकास जामसांडेकर यांनी दिली. दुसरीकडे, गणेश चतुर्थीच्या दिवशी चलनात आलेली दोनशेची नोट दानपेटीत मात्र झळकली आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीत  दोनशेच्या सात नोटा मिळाल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी दिली.

सेल्फी काढण्यापुरती नोट द्या

निश्चलनीकरणानंतर नव्याने आलेल्या २००० व ५०० च्या नोटांसोबत सेल्फी काढून ते छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकण्याची हौस अनेकांनी पूर्ण केली होती. मात्र पहिल्यांदाच आलेल्या २०० रुपयांच्या नोटांचा बाजारात तुटवडा असल्याने नोटेसोबत सेल्फी काढण्याची अनेकांची इच्छा अपूर्ण राहिली आहे. त्यामुळे किमान सेल्फी काढण्यापुरती तरी दोनशे रुपयांची नोट उपलब्ध करा, असे संदेश समाजमाध्यमांवर फिरत आहेत.

First Published on September 14, 2017 4:14 am

Web Title: 200 rupees note still not available in atm