‘सेवा हमी कायद्या’तील तरतुदीनुसार सर्व सेवा ई-पोर्टलच्या माध्यमातून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत नागरिकांकरिता उपयुक्त अशा २०० सेवा ऑनलाइन करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली.
स्मार्ट हेल्थ, स्मार्ट गव्हर्नन्स, स्मार्ट सिटीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या विषयावर ‘ताज विवांता’ येथे आयोजित ‘ई-इंडिया महाराष्ट्र समिट’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. इमारतींच्या प्रकल्प आराखडय़ांना मंजुरी देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जी पद्धती अवलंबली आहे, तीच राज्यातील अन्य महापालिका आणि नगरपालिकांमध्ये राबविण्यात येईल. माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.