News Flash

दोन हजार जादा तिकिटे, त्यात ८४५ बनावट!

दोन एप्रिल २०११ : विश्वचषकाचा अंतिम सामना, भारत वि. श्रीलंका. त्या संस्मरणीय दिवसाला अडीच वर्षे उलटून गेली आहेत. तरीही त्यातील काही क्षणांची

| November 3, 2013 03:15 am

दोन  हजार  जादा  तिकिटे,  त्यात  ८४५   बनावट!

दोन एप्रिल २०११ : विश्वचषकाचा अंतिम सामना, भारत वि. श्रीलंका. त्या संस्मरणीय दिवसाला अडीच वर्षे उलटून गेली आहेत. तरीही त्यातील काही क्षणांची उजळणी, असंख्य भारतीय मन:चक्षुंसमोर करत असतील. झहीर खानचा पहिला स्पेल.. महेला जयवर्धनची प्रेक्षणीय खेळी.. मग गौतम गंभीरची दमदार सलामी. विजयश्री खेचून आणणारा धोनीचा षटकार. मग साऱ्या भारतीय संघानं सचिन तेंडुलकर डोक्यावर घेतलेलं, अन् वानखेडे स्टेडियमला आतून मिरवत नेलेलं. इतिहासजमा झालेल्या ब्रिटिश साम्राज्यातील, सुमारे दोनशे कोटी लोकसंख्येच्या वीस देशातील विश्वविजेतेपदाचा तो जल्लोष..
पुन: पुन्हा नजरेपुढे आणावेत असे ते आनंददायी क्षण. भ्रष्टाचार, गुंडगिरी, दिशाहीनता यांनी ग्रासलेल्या भारतीयांच्या जीवनात थोडी उमेद निर्माण करून जाणारे ते क्षण..
सामना- सौदेबाजीचे प्रवाद बाजूला ठेवण्यास, क्रिकेटपटू मैदान गाजवत होते. मानधन, इनाम व जाहिराती यांच्यामार्फत नवनव्याने करोडपती होत होते. पण त्यांच्या सामन्यांचे संयोजन करणाऱ्या संस्था, आणि त्या संस्थांचे काही नोकर व कार्यकर्ते लुटारू टोळीसारखा धुडगूस घालत होते. चालक-मालक यांच्या मूक संमतीने वा संमतीने हे सारं घडत होतं. पैशाची गंगा धोधो वाहात होती. त्यात हात धुवून घेत. काही ठिकाणी, उशीरानं का होईना, गैरप्रकारांची चौकशी होत होती, दडपलीही जात होती. बऱ्याच ठिकाणी त्याविषयी चालत होती निव्वळ कुजबूज.
विश्वचषक-२०११ ला व्यासपीठ पुरवणाऱ्या क्रिकेटच्या पंढरीत काय घडत असावं?
दोन हजार जादा छपाई
आधी समजून घेऊया, सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची उधळपट्टी करून नूतनीकरण केलेल्या वानखेडे स्टेडियमची नवी क्षमता. कॉर्पोरेट बॉक्सेस (१०२५ आसनं) व स्पेशल स्टँड (११०) यांची ११३५ आसने वगळता, स्टेडियममध्ये ३२०१४ प्रेक्षकांची सोय होती, असे चौकशी समितीपुढे ठेवलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. पण प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी अंतिम सामन्याआधी २७ मार्च २०११ ला दिलेल्या अहवालानुसार, प्रेक्षक क्षमता होती ३२,९०९. तिकीट वाटपासाठी हा आकडा तेव्हाच्या कार्यकारिणीने संमत केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोअर कमिटीने स्टेडियमची पाहाणी केली आणि त्या दिवशी ही क्षमता ३२,१८४ असल्याचा अभिप्राय दिला.
गंमत तर बघा : नूतनीकरणानंतर स्टेडियममध्ये सर्वत्र बाकांऐवजी बकेट-खुच्र्या बसवल्या गेल्या. प्रत्येक खुर्चीस खास तिचा क्रमांक दिला गेला. आता खुच्र्या तेवढेच प्रेक्षक, असा जमाना सुरू होणार, असंही सांगितलं गेलं तरीही क्षमतेच्या मोजणीत बत्तीस हजारांवर सुमारे नऊशेपर्यंतचा गोंधळ!
हा अर्थपूर्ण गोंधळ क्षणभर बाजूला ठेवूया. यापैकी कोणत्याही मोजणीनुसार दीड-दोन हजार जास्त तिकीटं छापण्याच्या ऑर्डर मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिल्या. अंतिम सामन्याआधीच्या पाच आठवडय़ात छपाईच्या आठ ऑर्डर्स दिल्या गेल्या. अन् चक्क चौतीस हजार एकशे एकोणीस (३४,११९) तिकीटं छापली गेली!
या ऑर्डर्सचा तपशील चौकशी समितीने दिला. जो दडपण्यापेक्षा, मुंबईतील क्रिकेट शौकिनांपुढे ठेवला जाणं गरजेचं आहे. तो तपशील-
स्टेडियमची क्षमता बहुधा ३२,०१४- पण मुंबई क्रिकेट असोसिएशनची छपाई ऑर्डर या क्षमतेपेक्षा दोन हजारनी जास्त अशी ३४,११९ ची!
खरं तर दोन फेब्रुवारीच्या दोन वेगवेगळ्या ऑर्डर्समार्फत छापली गेली ३२०६४ तिकीटं. तीच मूळात तीन क्षमतेपेक्षा वीसने जास्त होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सहा ऑर्डसमार्फत आणखी दोन हजार तिकीटं छापली जावीत, हा काय प्रकार?
८४५ बनावट तिकिटे
चौकशी- समितीच्या पाहाणीतील गंभीर बाब म्हणजे ८४५ डुप्लीकेट तिकीटांची छपाई. डुप्लीकेट म्हणजे त्याच क्रमांकांची दुसरी वा  बनावट तिकीटे!
विशेष म्हणजे डुप्लीकेट तिकीटांच्या छपाईबाबत चौकशी-समितीस, मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे चकार शब्दाने काहीही सांगितलं गेलं नव्हतं! छपाईच्या आठ ऑर्डर्स का काढल्या गेल्या? स्टेडियमच्या क्षमतेची पाहाणी कोअर-कमिटीने केल्यानंतर, क्षमतेपेक्षा दोन हजार जादा तिकीटं का छापली गेली? किमान ८४५ डुप्लीकेट तिकीटं छापण्याचे प्रयोजन कोणते? चौकशी समितीने हे सारे प्रश्न विचारले, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सीईओ, नाईक यांनीही समितीला त्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही. आता समितीचा अहवालच दडपला जात आहे. पण तिकीटांच्या छपाईबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न संस्थांना व क्रिकेटप्रेमींना ही माहिती त्या फटक्यात नाकारली जात आहे ही कुठली लोकशाही? ही कुठली पारदर्शकता?     (समाप्त)

छपाई ऑर्डर्स    
२०११ फेब्रु.-मार्च
ऑर्डरची     बिल     तिकिटे
तारीख        तारीख
फेब्रु. २५        २८    ३१,८१४
फेब्रु. २५        २८    २५०
मार्च २        ३    ९०
मार्च ४        ४    ९३५
मार्च १२        १५    ५०
मार्च १७        १८    ६७४
मार्च २७        २८    २८१
मार्च २७        २८    २५
एकूण ऑर्डर        ३४११९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2013 3:15 am

Web Title: 2000 extra tickets 845 fake tickets of cricket world cup 2011
Next Stories
1 भाऊबिजेला बेस्ट धावणार
2 आयुर्वेद, युनानीच्या हजार विद्यार्थ्यांचे नशीब अधांतरी
3 उंच इमारतींची गगनचुंबी थांबू नये म्हणून मुंबईच्या डोक्यावर आणखी एक रडार
Just Now!
X