हिट अँड रन निकालाप्रकरणी बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याला न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी आज (गुरूवार) न्यायायलयाने दिली. दबंग सलमान खानचा आज ४७ वा वाढदिवस असून २८ सप्टेंबर २००२ रोजी बेदरकारपणे गाडी चालवून, फूटपाथवर झोपलेल्या लोकांना धडक दिल्याप्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अपघातात एकजण ठार आणि इतर तिघेजण जखमी झाले होते.
या प्रकरणी आज सकाळी ११ वाजता सलमान खानला, मुंबईतल्या बांद्रा न्यायालयात उपस्थित रहावे लागणार होते. मात्र, न्यायालयाने त्याला सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची परवानगी दिली आहे.
याप्रकरणी सलमान खान आत्तापर्यंत ८२ वेळा कोर्टात गैरहजर राहिला आहे. त्यामुळे सलमान खानला जाणीवपूर्वक वाचवलं जात असल्याचा आरोप, माजी आयपीएस अधिकारी वाय. पी सिंग आणि सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी केला होता. त्यानंतर २७ डिसेंबरला सलमानला कोर्टात हजर राहण्याची नोटीस बांद्रा न्यायालयाने बजावली होती.
सलमान खानचा आज ४७ व्या वर्षात पदार्पण करत असून, नुकत्याच आलेल्या ‘दबंग-२’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमा केला आहे. सलमानने यावर्षी वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करणार असल्याचे म्हटले आहे. माझ्याविरुद्ध जयपूर आणि मुंबई न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांचा निकाल लागल्यानंतरच मी लग्नाचा विचार करेन, असे सलमानने अलिकडेच म्हटले होते.
गेल्या काही वर्षात सलमानच्या ‘वॉन्टेड’, ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टाइगर’ आणि ‘दबंग-२’ या चित्रपटांनी सुपरहिटच्या यादीत स्थआन पटकावून करोडोंचा गल्ला जमा केला आहे. तसेच ‘दस का दम’ चे दोन आणि ‘बिग बॉस’चे तीन हंगामही यशस्वी ठरले आहेत.