विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे निरीक्षण

मालेगावात २००८ साली झालेला बॉम्बस्फोट हा हिंदूराष्ट्राच्या निर्मितीसाठी घडवला गेला, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले आहे. या बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, सुधाकर द्विवेदी, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि अजय राहिरकर यांना ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करायचे होते. त्याचसाठी बॉम्बस्फोट घडवून एका विशिष्ट समुदायाच्या मनात त्यांना दहशत निर्माण करायची होती, असे निरीक्षण राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. टेकाळे यांनी निकालपत्रात नोंदवले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह आणि पुरोहितसह सात आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) घातपाती कारवाईचा कट रचणे, त्याचा भाग म्हणून बॉम्बस्फोट घडवून निष्पापांचे बळी घेणे, या गंभीर आरोपावरून खटला चालवण्यात येणार आहे. त्याची कारणमीमांसा करणारे १३० पानी निकालपत्र गुरूवारी उपलब्ध झाले. त्यात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

साध्वी-पुरोहितसह नऊ आरोपींवरीह कठोर अशा ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत ठेवण्यात आलेले सर्व आरोप विशेष न्यायालयाने बुधवारी रद्द केले होते. त्याचवेळी राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे या आरोपींना वगळता साध्वी-पुरोहितसह अन्य सात आरोपींवर दहशतावादी कारवायांचा कट रचून तो अंमलात आणणे हा आरोप तसेच भादंविच्या कलमांनुसार हत्या, हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे यासारख्या आरोपांसह स्फोटक कायद्याअंतर्गतही आरोप निश्चित करण्यात येतील तसेच खटला चालवण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

न्यायालयाने आरोपींवरील मोक्का का हटवण्यात आला तसेच त्यांच्यावर या नव्या गंभीर आरोपांअंतर्गत खटला का चालवण्यात येणार आहे, याची कारणमीमांसा न्यायालयाने स्पष्ट नमूद केली आहे. तसेच साध्वीविरोधात कुठलेही पुरावे सापडलेले नाहीत आणि बॉम्बस्फोटासाठी तिची दुचाकी वापरली गेली, पण तिला त्याची कल्पना नव्हती, हा ‘एनआयए’चा दावा न्यायालयाने फेटाळला होता. तो फेटाळण्यामागील कारणांची मांडणी सविस्तरपणे केली आहे. बॉम्बस्फोटापूर्वी भोपाळ येथे एका बैठकीत हा कट आखला गेला. त्या बैठकीबाबत साक्षीदारांनी दिलेल्या जबाब विचारात घेता, आरोपींना ‘हिंदूू राष्ट्र’ निर्माण करायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विशिष्ट समुदायाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हा कट रचल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.

औरंगाबाद आणि मालेगाव येथे वाढत असलेल्या जिहादी कारवाया रोखण्यासाठी काय करता येईल, यावर बैठकीत चर्चा झाली होती. शिवाय ‘अभिनव भारत’ या संघटनेचा पुरोहित याला विस्तार करायचा होता, याबाबत त्याने या बैठकीत मत व्यक्त केले होते. मशिदीच्या परिसरात आणि पवित्र महिन्यात बॉम्बस्फोट घडवण्यात आला. ही बाब लक्षात घेतली तर साक्षीदारांनी दिलेल्या जबाबातून आरोपींचा हेतू स्पष्ट होत असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

पुरोहित या सगळ्याचा कर्ताधर्ता होता आणि तो हे लष्करातील आपल्या वरिष्ठांना अंधारात ठेवून करत होता हेही या बैठकीतील चर्चेतून स्पष्ट होत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.