मुंबई शहरात एनएसजी, फोर्स वन, क्यूआरटीचे कमांडो शस्त्रसज्ज  

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याची पुनरावृत्ती घडल्यास अवघ्या काही मिनिटांत दहशतवाद्यांना एनएसजी, फोर्स वन, शीघ्र प्रतिसाद पथकातील (क्यूआरटी) प्रशिक्षित, अद्ययावत शस्त्रसुसज्ज कमांडो चोख प्रत्युत्तर देऊ शकतील. हल्ल्यानंतरच्या दहा वर्षांमध्ये सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय, गोपनीय माहितीची देवाणघेवाण, अद्ययावत शस्त्रे, साधनसामुग्री, प्रशिक्षित कमांडो पथकांचे तळ याबरोबरच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर भर देण्यात आला. दहशतवादी हल्ला होऊच नये, केला तरी प्रत्युत्तराचा अवधी कमी असावा आणि हल्ल्याचा बीमोड त्वरित करावा, असा उद्देश समोर ठेवून विविध उपाययोजना आखण्यात आल्या.

हल्ला कसाही होऊ शकतो..

राज्याचे पोलीस प्रमुख दत्ता पडसलगीकर यांच्यासह सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या मते मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने अतिरेकी हल्ल्याचे सावट कायम असेल. मात्र हल्ला २६/११ प्रमाणेच असेल असे नाही. हल्ला कसाही होऊ शकतो. मधल्या काळात जगाच्या विविध बडय़ा शहरांना एकल हल्ला (लोन वूल्फ अ‍ॅटॅक), आत्मघातकी हल्ल्यांनी हादरवले. मुंबईत अशा प्रकारचा हल्ला होऊ नये या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात आहेत.

दहा वर्षांपुर्वी अरबी समुद्रातील त्रिस्तरीय सुरक्षा कवच भेदून लष्कर-ए-तोयबाचे दहा पाकिस्तानी अतिरेकी शहरात घुसले होते. त्यांनी हल्ला करताच सुरुवातीला मुंबई पोलीस आणि त्यानंतर मरिन कमांडोंनी अतिरेक्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून हरियाणा तळावरून एनएसजीचे २०० कमांडो २७ नोव्हेंबरच्या पहाटे मुंबईत दाखल झाले. परिस्थितीचा अंदाज घेत, अचूक रणनीती आखत त्यांनी नरिमन हाऊस, हॉटेल ट्रायडेन्ट आणि हॉटेल ताज अतिरेक्यांच्या कब्जातून मुक्त केले. एनएसजी कमांडोंना मुंबईत येण्यासाठी नऊ तास लागले. त्या नऊ तासांमध्ये अतिरेक्यांनी जास्तीत जास्त विध्वंस केला होता.

कमांडो सज्ज

हल्ल्यानंतर मुंबईत एनएसजीचा तळ उभारण्यात आला. एनएसजीच्याच धर्तीवर राज्य सरकारने फोर्स वन हे प्रशिक्षित कमांडोंचे पथक स्थापन केले. शीघ्र प्रतिसाद दलाची (क्यूआरटी) नव्याने बांधणी करण्यात आली. आजच्या घडीला कोणत्या प्रकारच्या अतिरेकी हल्ल्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकतील अशा कमांडोंची तीन पथके सज्ज आहेत. त्यांनी खडतर प्रशिक्षण घेतले आहे. ती अद्ययावत शस्त्रे, दारूगोळा, क्षणात कुठेही धडकू शकेल अशा साधनसामुग्रीसह सज्ज आहेत. त्यांच्या जोडीला शहरात सीसीटीव्हींचे जाळे आहे. अतिरेक्यांनी हल्ला केल्यास सर्वप्रथम त्यांच्यावर तुटून पडतील अशा कॉम्बॅट व्हॅनही सज्ज आहेत.

सुरक्षा यंत्रणांमधला समन्वय

हल्ल्यानंतर बंदोबस्त, प्रतिहल्ल्यासाठी उपाययोजनांसह सुरक्षा यंत्रणांमधला समन्वय सुधारला. हल्ल्यापूर्वी हा समन्वय पुरेसा नव्हता. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, विविध राज्यांमधील दहशतवादविरोधी पथकांचे प्रमुख, तटरक्षक दल यांच्या महिन्याकाठी बैठका सुरू झाल्या. त्यात गोपनीय माहितीची देवघेव, सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हानांबाबत सातत्याने चर्चा होऊ लागल्या. समुद्रसीमा सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस, तटरक्षक दल आणि नौदलाने एकत्रितरीत्या सागर कवच या उपक्रमाद्वारे प्रभावीपणे सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली. शहरात ठिकठिकाणी मॉकड्रील्स सुरू करून पोलीस किती सतर्क आहेत आणि हल्ला परतवून लावण्यास कितपत सज्ज आहेत याची पडताळणी सुरू झाली. राज्य पोलीस दलातील गोपनीय माहिती मिळवणाऱ्या यंत्रणा सुसज्ज केल्या गेल्या. तत्कालीन सहआयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अ‍ॅन्टी टेररिस्ट सेल’ सुरू करून राज्य दहशतवादविरोधी पथकाला पूरक व्यवस्था निर्माण केली. अतिरेक्यांनी हल्ला केल्यास टप्प्याटप्प्याने काय करावे, कोणाची काय जबाबदारी हे निश्चित करणारी कार्यप्रणाली विकसित केली गेली. पोलीस आयुक्त, सहआयुक्तांपासून पोलीस ठाण्यांच्या पातळीवर बैठका घेऊन आणीबाणी उद्भवल्यास काय करावे याची उजळणी करण्यात आली.

२६/११च्या हल्ल्याच्या वेळी कोणी काय करावे हे ठरवणे किंवा रणनीती आखण्यात बराच वेळ खर्ची पडला. जुनाट, अपुऱ्या शस्त्रांच्या आधारे अतिरेक्यांना प्रत्युत्तर दिले गेले. परंतु दहा वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. अद्ययावत शस्त्रे, साधनसामुग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ शहराच्या सुरक्षेसाठी तैनात आहे.

जागृत मुंबईकर

अतिरेकी हल्ल्यानंतर दहशतवादविरोधी लढय़ात सर्वसामान्यांना सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांना सतर्क करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘जागृत मुंबईकर’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. शाळा-महाविद्यालये, शासकीय कचेऱ्या, खासगी-कॉर्पोरेट कार्यालये, वस्त्यांमध्ये जाऊन दहशतवाद म्हणजे काय, मुंबईसह जगातल्या प्रमुख शहरांमध्ये घडलेले हल्ले, दहशतवादाचे बदलते स्वरूप, सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी, काय करावे-काय टाळावे याबाबत नागरिकांना माहिती दिली जाते.

प्रशिक्षित कमांडो

एनएसजी, फोर्स वनचे सुसज्ज तळ मुंबईत आहेत. त्याशिवाय मुंबई पोलिसांच्या दक्षिण, मध्य, पश्चिम, उत्तर आणि पूर्व प्रादेशिक मुख्यालयांमध्ये क्यूआरटीचे कमांडो सज्ज ठेवण्यात आले आहे.

एटीसी

प्रत्येक पोलीस ठाण्यातील ‘अ‍ॅन्टी टेररिस्ट सेल’च्या कार्यक्षेत्रात भाडय़ाने घर घेणारे, मोबाईल-सीमकार्ड घेणारे, शिधापत्रिकांसह विविध कागदपत्रे बनवून घेणारे अशा प्रत्येकावर या ‘सेल’चे लक्ष आहे. मुख्य प्रवाहातून भरकटलेले तरुण आणि त्यांची माथी भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती घेतली जाते.

समन्वय

मुंबई पोलीस, राज्य दहशतवादविरोधी पथक आणि केंद्रीय, परराज्यांमधील सुरक्षा यंत्रणांमध्ये माहितीच्या आदान-प्रदान प्रक्रियेत सातत्य आले आहे. चढाओढ, स्पर्धा किंवा वर्चस्वाचा वाद बाजूला ठेवून या यंत्रणा संयुक्त सराव आणि कारवायांवर जास्त भर देत आहेत.

विचार प्रक्रिया

हल्ला कसा होऊ शकेल, अतिरेकी कोणता मार्ग निवडू शकतील, कोणत्या बाबतीत आपण कमी पडतो आहोत, कुठे जास्त भर देणे आवश्यक आहे, अशा विविध मुद्यांवर अधिकाऱ्यांमध्ये नियमित चर्चा होते. आभासी परिस्थिती उभी करून हल्ला उधळून लावणे, थोपवणे, चोख प्रत्युत्तर देणे याचा सराव करण्यात येतो.

सीसीटीव्ही

शहरातली मोक्याची, महत्त्वाची, संवेदनशील ठिकाणे कोणती, हे निश्चित करून तेथे मनुष्यबळ तैनात करण्यासह सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.