विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिन्याभरापूर्वी पोलीस बदल्यासंदर्भात घोटाळ्यांबद्दल केलेल्या आरोपांमध्ये वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगचा उल्लेख केला होता. याचसंदर्भात आता त्यांना मुंबई पोलिसांनीच समन्स पाठवले असून या प्रकरणातील तपासामध्ये सहकार्य करण्यास सांगितले आहे. २०१९ च्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये मुंबईतील सायबर पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात हे समन्स बजावण्यात आलेत. हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेव्हा शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. शुक्ला यांना बुधवारी उपस्थित राहण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

रश्मी शुक्लांनी केलेल्या फोन टॅपिंगवरुन राजकारण…

वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी गेल्या वर्षी केलेल्या काही फोन टॅपिंगमुळे राज्यात खळबळ उडाली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर तीव्र टीका केली होती. यावरुनच सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचप्रमाणे काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते.  भाजपाने रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा आणि फोन टॅपिंग प्रकरणाचा हवाला देत राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांवरून काँग्रेस थेट देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेल्या पेनड्राइव्हबद्दलही काँग्रेसनं शंका उपस्थित केली होती.

“रश्मी शुक्ला यांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं होतं. ज्याचा अहवाल त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये दिला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांनी आरोप केला. या तिन्हींचा एकमेकांशी संबंध नाही. वेगवेगळ्या काळात झालेल्या या गोष्टी आहेत. यात परमबीर सिंह यांची चौकशी होऊ नये. मूळ मुद्दा दुर्लक्षित राहावा, याकरता हे केलं का? परमबीर सिंह यांना कव्हरिंग फायर देण्याचा प्रयत्न झाला का? भाजपाची हीच व्यूहरचना होती का? यांचं उत्तर काही महिन्यात मिळेल. रश्मी शुक्लांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलेलं. त्यांनी तो अहवाल ऑगस्टमध्ये दिला. त्याला सात महिने होऊन गेले. तो अहवाल दिल्यानंतर अधिवेशनही झाली. या सहा-सात महिन्यात भाजपाला आठवण झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला जातोय आणि ते उत्तर देत नाहीयेत. फडणवीस यांनी दाखवलेली पेनड्राईव्ह अहवालासोबत देण्यात आली नव्हती. मग फडणवीसांनी ६.३ जीबीची कोणती पेनड्राइव्ह दाखवला? केंद्रीय गृह सचिवांना जाऊन काय दिलं?,” असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केलेला.