मुंबई : एसटी महामंडळाला करोनाचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. आतापर्यंत एसटीतील करोना मृतांची संख्या २०५ वर पोहोचली असून एकू ण बाधित कर्मचाऱ्यांची संख्याही सात हजार ७०८ झाली आहे. सोमवारी एकाच दिवशी २६९ कर्मचारी बाधित आढळून आले.

गेल्या वर्षभरात एसटीचे चालक, वाहकांसह, तांत्रिक कर्मचारी व आगार, स्थानक तसेच मुख्यालयातील कर्मचारी सातत्याने कर्तव्यावर येत आहेत. करोनाच्या सुरुवातीच्या काळापासून परराज्यात जाणाऱ्या श्रमिकांसाठी एसटी चालवण्यात आल्या. त्यानंतर टाळेबंदीमुळे एसटीची राज्यातील सेवा बंद असली तरी मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवांसाठी एसटी सुरूच होत्या. टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर राज्यातील एसटी सेवा पूर्ववत झाली. त्यानंतर करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली.

वारसांना नोकरी नाहीच

करोनाची लागण होऊन मृत झालेल्या एसटीतील ११ कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. तर अन्य कर्मचाऱ्यांना आर्थिक किं वा अन्य मदत देण्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. उर्वरित मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता. यातील एकालाही नोकरीचे पत्र मिळालेले नाही.

* २६ एप्रिलपर्यंत एसटीतील करोनाबाधितांची संख्या सात हजार २३९ होती. यामध्ये १७८ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

* ३ मे ला राज्यातील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या सात हजार ७०८ पर्यंत पोहोचली असून २०५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आठवडाभरातच २७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

* आतापर्यंत सहा हजार ३४ कर्मचारी उपचार घेऊन घरी परत गेले. तर एक हजार ४७० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

*आतापर्यंत एसटीतील एक लाख कर्मचाऱ्यांपैकी ३० हजार ६९३ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.