कचरा वर्गीकरण करून सुक्या व ओल्या कचऱ्याची व सांडपाण्याची विल्हेवाट लावणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात १५ टक्क्य़ांपर्यंत सवलत देण्याची योजना पालिकेने आणली असून त्यासाठीचे धोरणही तयार करण्यात आले आहे. ही सवलत याच आर्थिक वर्षांत लागू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र संपूर्ण मुंबईत केवळ २०६ संस्थांनाच सध्या तरी ही सवलत लागू होऊ शकते. केवळ याच सोसायटय़ांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असून त्यांना शून्य कचऱ्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पालिकेतर्फे केला जाणार आहे.

कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायटय़ांना मालमत्ता करात सवलत देण्याचे पालिकेने जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन विभागाने धोरण तयार केले आहे. ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची आपल्याच स्तरावर विल्हेवाट लावणाऱ्या सोसायटय़ांना व घरांनाही ही सवलत मिळू शकेल. पालिकेच्या कचराभूमीची क्षमता संपत चालल्यामुळे पालिकेने कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली. घन कचरा व्यवस्थापन २०१६ लागू करण्यात आले. त्यामुळे आता प्रत्येक कुटुंबाला सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचाच पुढचा भाग म्हणून पालिकेने आता ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट आपल्याच स्तरावर लावणाऱ्या सोसायटय़ा व घरांना मालमत्ता करात सवलत देण्याचे ठरवले आहे. ही सवलत देण्यासाठी काय निकष असावेत याकरिता घनकचरा विभागाने धोरण ठरवले आहे. त्याअंतर्गत सध्या सर्व विभागांतून कोणत्या सोसायटय़ा आधीच कचरा वर्गीकरण व खत प्रकल्प राबवतात, त्यांची माहिती गोळा करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.

‘प्रत्येक प्रभागात सध्या साहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून सोसायटय़ांमधून जनजागृती करणारी शिबिरे घेत आहोत. त्यामध्ये सोसायटय़ांच्या प्रतिनिधींना बोलावतो. तसेच विभागात एखादी सोसायटी आधीच वर्गीकरण करीत असेल तर त्यांच्यामार्फत इतरांना मार्गदर्शन केले जाते व नव्या सोसायटय़ांना प्रोत्साहन दिले जात आहे. ही सवलत याच आर्थिक वर्षांत दिली जाणार आहे. आता मालमत्ता कराची बिले गेलेली असली तरी सोसायटय़ा नंतरही सवलत मागू शकतात,’ अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त अशोक खरे यांनी दिली.

अशी मिळणार सवलत

* इमारतीच्या आवारात निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करणाऱ्या इमारतींना मालमत्ता करात ५ टक्के सवलत मिळेल.

* संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करून सुका कचरा विल्हेवाटीसाठी पुनर्वापर करणाऱ्याला देऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ५ टक्के सवलत

* इमारतीच्या आवारातील सांडपाण्याचा पुनर्वापर करून ते पाणी स्वच्छतागृहासाठी वापरले जात असल्यास आणखी ५ टक्के सवलत

* ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्यांना व सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणाऱ्या सोसायटय़ांना मालमत्ता करात संपूर्ण १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.