राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून एसटी महामंडळातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. गेल्या १२ दिवसात एसटी महामंडळातील २१ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून करोनाने मृत्यू झालेल्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या आता १३८ वर पोहोचली आहे. गेल्या १२ दिवसात राज्यभरातील एसटी महामंडळातील ६४६ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित झाले होते. यामध्ये आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी यांचा समावेश होता. त्याचबरोबर एसटी महामंडळातील अनेकांना करोनाची लागण झाली होती.

सध्या एसटी महामंडळातील बाधितांची संख्या ५,७३९ पर्यंत पोहचली आहे. तर उपचाराअंती ४,७९४ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ८०७ करोनाबाधित कर्मचारी उपचाराधीन आहेत. सोमवारी एका दिवसात एसटीचे ६८ कर्मचारी बाधित झाले आहेत. ३१ मार्चला एसटी महामंडळातील ५४२ कर्मचारी उपचार घेत होते. त्यानंतर गेल्या १२ दिवसांमध्ये बाधितांची संख्या वाढली आहे.

सोमवारी उस्मानाबाद विभागातील २६ कर्मचाऱ्यांना, तर सोलापूर विभागातील १० कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. गेल्या वर्षभरापासून नाशिक विभागातील ४४८ कर्मचारी बाधित झाले आहेत. त्याखालोखाल सांगली ४२३, सोलापूर ३८१, बीड ३३६, ठाणे २९५ कर्मचारी आतापर्यंत बाधित झाले आहेत.  सध्या नागपूर विभागात एसटी महामंडळाचे सर्वाधिक १३५ कर्मचारी करोनाचे उपचार घेत आहेत. धुळे विभागात ८९ कर्मचारी उपचाराधीन आहेत.