२१ आमदारांच्या निवृत्तीनंतर भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष

विधान परिषदेचे २१ आमदार निवृत्त होत असल्याने या वर्षांत वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक आमदार या निवडणुकीनंतर निवडून येणार आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित आमदारांची संख्या सर्वाधिकच राहणार आहे.

विधान परिषदेच्या २१ विद्यमान आमदारांची मुदत या वर्षांत संपुष्टात येत आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील यांचा त्यात समावेश आहे. सध्या विधान परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २३ आमदार असून, काँग्रेस (१९), भाजप (१८), शिवसेना (९), असे संख्याबळ आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वाधिक आठ आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. इंदिरा काँग्रेस (४), भाजप (४), शिवसेना (२), शेकाप (१), लोकभारती (१) तर अपक्ष (१) असे एकूण २१ सदस्य निवृत्त होणार आहेत.

भाजपचे संख्याबळ वाढणार

नव्या रचनेत भाजपचे संख्याबळ वाढणार आहे. विधानसभेतून निवडून येणाऱ्या ११ सदस्यांची मुदत जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या २७ मतांची आवश्यकता आहे. छोटे व अपक्षांच्या मदतीने भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. ६३ मते असल्याने शिवसेनेचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिवसेनेकडे सात मते अतिरिक्त ठरतात. काँग्रेस व राष्ट्रवादीचे एकत्रित तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. २०१६ मध्ये राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला होता. यंदा काँग्रेस दोन तर राष्ट्रवादीचा एक असा समझोता दोन्ही पक्षांमध्ये दोन वर्षांपूर्वी झाला आहे. परिणामी विधानसभेतून निवडून द्यायच्या ११ जागांमध्येच भाजपचे संख्याबळ तीनने वाढणार आहे, तर राष्ट्रवादीचे संख्याबळ तीनने घटणार आहे. काँग्रेसला दोन जागांचा फटका बसणार आहे. ११व्या जागेवर कोण बाजी मारतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये शेकापचे जयंत पाटील यांनी बाजी मारली होती. यंदा एखादा आर्थिकदृष्टय़ा प्रबळ उमेदवार रिंगणात उतरला आणि शिवसेनेने त्यांच्याकडील अतिरिक्त मते दिल्यास चुरस होऊ शकतो. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने घोडेबाजाराला ऊत येऊ शकतो.

स्थानिक संस्था मतदारसंघातही चुरस

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघात दिलीप देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असले तरी या मतदारसंघात भाजपने आतापासूनच जोर लावला आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाली तर भाजपचे संख्याबळ वाढले आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयंत जाधव यांना जागा राखणे कठीण जाणार आहे. जाधव हे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक. भुजबळांच्या अनुपस्थितीत जाधवांची डाळ शिजणे कठीण आहे. त्यातच महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये जिल्ह्यत राष्ट्रवादीची पीछेहाट झाली होती. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ कायम राखण्याकरिता राष्ट्रवादीने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सुनील तटकरे, त्यांचे पुत्र अनिकेत वा शेकापचे जयंत पाटील यापैकी एक जण रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या समर्थकांची संख्या जास्त असली तरी भाजपला ही जागा जिंकणे सोपे नाही. गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा आणि अमरावती हे दोन्ही मतदारसंघ कायम राखण्यात भाजपला फार काही त्रास होणार नाही.

पदवीधर मतदारसंघांच्या दोन जागांपैकी मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत हे पुन्हा नशीब आजमविणार आहेत. भाजपची भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरेल. कोकण पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना भाजप व शिवसेनेचे आव्हान असेल. कोकणमध्ये उमेदवारीवरून भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. शिक्षक मतदारसंघात जनता दल युनायटेड किंवा लोकभारतीचे कपिल पाटील हे हॅटट्रिक साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजप त्यांना आव्हान देण्यासाठी तयारीत उतरणार आहे.

राजकीय समीकरणे बदलल्यावरही भाजपला विधेयके मंजूर करणे सोपे जाणार नाही. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असेल. यामुळे विरोधकांना चुचकारल्याशिवाय कामकाज सुरळीत होणार नाही.