18 March 2019

News Flash

विविध मागण्यांसाठी २१ रेल्वे प्रवासी संघटना दिल्लीत

कार्यालयीन वेळा बदलण्याचा विचार रेल्वे आणि राज्य सरकारकडून केला जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांची भेट घेणार

रेल्वेचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करा, नवीन प्रकल्पांच्या कामांनाही गती द्या, प्रवाशांचे होणारे अपघात रोखा, लोकल प्रवास सुकर करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदला यासह अन्य काही मागण्यासांठी मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अखत्यारीत असलेल्या २१ संघटना एकत्र आल्या आहेत. या मागण्या घेऊन प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी लवकरच दिल्लीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांची भेट घेणार आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) एमयूटीपीमार्फत विविध प्रकल्प राबविले जात आहेत. यामध्ये ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, कल्याण-पनवेल-वसई टर्मिनस, कळवा ते ऐरोली कळवा लिंक रोड प्रकल्पांना गती मिळत नाही. त्यामुळे लोकल फेऱ्या वाढण्यास मदत मिळत नसून प्रवास सुकर झालेला नाही. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

यासंदर्भात उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख संघटक नंदकुमार देशमुख यांनी या मागण्यांसह मध्य रेल्वेवरील अनेक मागण्यासांठी दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

त्यासाठी महासंघासोबत असणाऱ्या एकूण २१ संघटनांचे प्रतिनिधीही असतील. त्याआधी संघटनांच्या प्रतिनिधींची लवकरच बैठकही होणार असल्याचे देशमुख म्हणाले. त्यानंतरच रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्ड अध्यक्षांच्या बैठकीची तारीख निश्चित होईल. दिवसेंदिवस गर्दी वाढत असून प्रवास सुकर झालेला नाही. कार्यालयीन वेळा बदलण्याचा विचार रेल्वे आणि राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याचप्रमाणे काही प्रकल्प रखडले असून नवीन प्रकल्पांचीही घोषणा झालेली आहे. या सर्व मुद्दय़ांवर रेल्वे प्रशासनाशी प्रवासी संघटनांकडून चर्चा केली जाणार आहे.

महासंघाच्या उपाध्यक्ष लता अरगडे यांनीही याच मागण्यांवर दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे सांगितले. रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच प्रवास सुकर करण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल, यावर प्रशासनाशी चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख मागण्या

* लोकल गाडय़ांच्या वक्तशीरपणात सुधारणा करावी.

* प्रवासी संख्या वाढत असून रेल्वे यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे या यंत्रणेचा विस्तार करतानाच पायाभूत सुविधांवर भर द्या.

* रेल्वेने अनेक वर्षांपासून घोषणा केलेले प्रकल्प वेळेत मार्गी लावावेत.

* सीएसएमटी ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार स्वतंत्र  जलद कॉरिडोरची गरज आहे.

* प्रवासी अपघातांना आळा बसविण्यात यावा.

First Published on March 14, 2018 2:56 am

Web Title: 21 railway passenger associations reach in delhi to meet piyush goel