मुंबईत राहणारा अब्दुल्ला खान हा २१ वर्षांचा तरुण.. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्णही झाला नव्हता…पण या अपयशाने तो खचला नाही.. मीरा रोड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने शिक्षण पूर्ण केले…शिक्षण घेत असतानाच तो गुगलच्या एका स्पर्धेत  सहभागी झाला आणि स्वत:ची क्षमता सिद्ध करत त्याने आता गुगलमध्ये नोकरी देखील मिळवली आहे. त्याला गुगलने वर्षाचे १. २ कोटी रुपयांचे पॅकेज दिले असून सप्टेंबरपासून तो गुगलमध्ये रूज होणार आहे.

अब्दुल्ला खान याने मीरा रोड येथील श्री एल आर तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्यूटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. अब्दुल्लाला आयआयटीत जायचे होते. पण आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत तो अनुत्तीर्ण झाला. शेवटी अब्दुल्लाने तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला गुगलकडून ई- मेल आला. प्रॉग्रेमिंग साइटवर प्रोफाइल पाहून मला गुगलने मेल पाठवला होता, असे अब्दुल्ला सांगतो. “मी एका स्पर्धेत सहभागी झालो होतो. गुगलसारख्या मोठ्या कंपन्या या स्पर्धेतील प्रॉग्रेमरच्या प्रोफाइलवर लक्ष ठेवत असेल, असे मला कधीच वाटले नव्हते”, असे अब्दुल्लाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. मी गुगलसोबत करण्यास उत्सुक आहे, हा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, अशे त्याने आवर्जून सांगितले.

ऑनलाइन मुलाखतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर गुगलने अब्दुल्लाला तब्बल १. २ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. सप्टेंबरमध्ये अब्दुल्ला गुगलच्या लंडन येथील कार्यालयात रूजू होणार आहे. अब्दुल्लाचे बारावीपर्यंत शिक्षण सौदी अरेबियात झाले असून बारावीनंतर तो भारतात परतला. या १२ वीनंतरचे शिक्षण त्याने मुंबईतून घेतले.