गुन्हा घडल्यास तपासकामात मोलाची भूमिका सीसीटीव्ही कॅमेरे बजावतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्थानक आणि हद्दीत सीसीटीव्हींचा आवाका वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांत मध्य रेल्वे स्थानकांमध्ये २१० सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. याबाबतची प्रक्रियाही पूर्ण करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून दिवसाला ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २,९४१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातील ९४१ कॅमेरे हे इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम अंतर्गत आहेत. मात्र प्रवाशांची वाढत जाणारी संख्या, सुरक्षेवर पडणारा ताण पाहता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावर मध्य रेल्वेकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहेत. एल्फिन्स्टन रोड स्थानकात घडलेल्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेकडून स्थानकांतील सोयीसुविधा आणि सुरक्षा तपासणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्या वेळी या समितीकडूनही मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना करण्यात आली होती. मध्य रेल्वेवरील भायखळा, कुर्ला, घाटकोपर ते ठाणे तसेच दिवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण आणि त्यापुढील स्थानकांबरोबरच हार्बर रेल्वे स्थानकांतही हे कॅमेरे बसविण्यात येतील, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. यासाठी रेल्वेकडून आढावादेखील घेण्यात येत आहे. छेडछाड, विनयभंग, पाकीटमारी, मोबाइल चोरी इत्यादी कारणांमुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सीसीटीव्हींच्या माध्यमातून या गुन्हय़ाचाही छडा लावण्यात यश मिळते. सीसीटीव्हींचा आवाका वाढवल्यास गुन्ह्य़ांवर नियंत्रण मिळविण्यासही मदत मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वेकडून नेमण्यात आलेल्या समितीने १७ स्थानकांत आणखी सीसीटीव्हींची गरज असल्याचे सांगितले होते. १७ पैकी तर १३ हार्बर मार्गावरील स्थानकांचा समावेश होता. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील घाटकोपर, कुर्ला, वांगणी, भिवपुरी तर हार्बर मार्गावरील वडाळा, किंग्ज सर्कल, शिवडी, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, वाशी, सानपाडा, पनवेल, खांदेश्वर, खारघर, मानसरोवर स्थानकातही अतिरिक्त सीसीटीव्हींची गरज असल्याचे सांगितले होते.