शैलजा तिवले

करोना साथीच्या काळात विम्याच्या दाव्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून राज्यभरात आतापर्यंत करोनाशी संबंधित तब्बल २१०० कोटी रुपयांचे विमादावे दाखल झाले आहेत. देशभरात ६७०० कोटी रुपयांचे  दावे भरपाईसाठी खासगी विमा कंपन्यांकडे आले असून सर्वाधिक म्हणजे सुमारे ३९ टक्के दावे हे राज्यात दाखल झाले आहेत.

राज्यात मार्चपासून आतापर्यंत १६ लाख २५ हजार १९७ जण करोनाबाधित झाले आहेत. यापैकी १४ लाख ३१ हजार ८५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर  मृतांची संख्या ४२,८३१ नोंदली गेली आहे. एप्रिलपासून जसजसे बाधितांची संख्या वाढत आहे तसतसे विम्याच्या दाव्यांचे प्रमाणही वाढत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात राज्यात करोनाशी संबंधित सुमारे २१०० कोटी रुपयांचे १,७२,८०९ विमादावे दाखल झाले आहेत. देशभरात ४, ३८, ४८९ विम्याचे दावे सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या भरपाईसाठी प्राप्त झाले आहेत.

करोना संक्रमणाच्या काळात विम्याचे दावे तातडीने निकालात काढण्याच्या सूचना भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाने(आयआरडीए) दिल्या असल्या तरी राज्यातील एकूण दाव्यांपैकी ६५ टक्के दावे निकाली काढली आहेत. देशभरात हे प्रमाण ६८ टक्के आहे. राज्यात एकूण दाव्यांपैकी १.६० टक्के दावे हे करोना बळीचे आहेत. यातील २४ टक्के दावे उपचाराधीन रुग्णांचे आहेत, तर ७३ टक्के दावे हे उपचार घेऊन परतलेल्या रुग्णांनी दाखल केले आहेत.

दाव्याच्या ६५ टक्के रकमेची भरपाई

राज्यात सरासरी १,२२,७४९ रुपयांचे दावे दाखल झाले असून यातील ८०,५७६ रुपयांची भरपाई केलेली आहे. दाव्यामध्ये दाखल केलेल्या एकूण रक्कमेपैकी जवळपास ६५ टक्के रुपयांची भरपाई विमा कंपन्यांकडून केली जात असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे विमा कवच असूनही विमाधारकांनी रुग्णालयीन खर्चाच्या जवळपास ३५ टक्के रुपयांचा भरुदड सोसावा लागत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

दाव्यांचे प्रमाण एक टक्का

राज्यात आतापर्यंत सरकारी आणि खासगी रुग्णालयात १४ लाख ३१ हजार रुग्ण रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र त्या तुलनेत केवळ एक टक्का विम्याचे दावे भरपाईसाठी दाखल झाल्याचे निदर्शनास येते.

देयकांची तपासणी होणे गरजेचे

रुग्णालयांकडून नियंत्रित दरापेक्षी अतिरिक्त दर आकारले जात फुगवटा करून बिले दिली जात आहेत. सामान्य व्यक्तीला याबाबत अपुरी माहिती असल्याने रुग्णालयांच्या शुल्क फुगवटय़ाला चाप लावण्यासाठी आयआरडीए आणि राज्य सरकार यांनी पुढाकार घेत बिलांचे लेखापरीक्षण करणारी यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे. यात विमा तज्ज्ञांचा समावेश असणे महत्त्वाचे असल्याचे इन्श्युरन्स इन्स्टियूट ऑफ इंडियाच्या सदस्य आणि विमा सल्लागार भक्ती रसाळ यांनी नमूद केले.

आरोग्य विम्याच्या विक्रीत तेजी

आरोग्य विम्याच्या हप्त्यांमधून सुमारे ५० हजार कोटी रुपयांहून अधिक संकलन होते. तुलनेत २१०० कोटींची भरपाई केवळ ४ टक्के आहे. करोनाशी संबंधित दावे  वाढल्याने फारसा परिणाम झालेला नाही.  भीतीमुळे विमाविक्रीत तेजी आहे. भविष्यात भरपाईचे हे प्रमाण आणखी नगण्य होईल, असे पॉलिसी एक्स.कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवल गोयल यांनी सांगितले.

करोनाशी संबंधित विम्याच्या दाव्यांची आकडेवारी

* राज्यात दाखल झालेले एकूण दावे – १,७२,८०९

* दाव्याची एकूण भरपाई रक्कम – सुमारे २१०० कोटी रुपये

* मृत्यूशी संबंधित दावे -२७७६

* उपचाराधीन रुग्णांचे दावे – ४२,९०९

* उपचार पूर्ण झालेल्या रुग्णांचे दावे – १,२७,१२४

* भरपाई मिळालेले एकूण दावे -१,१२,७०७(६५ टक्के)

* भरपाई दिलेली एकूण रक्कम -सुमारे ९०८ कोटी रुपये

सर्वाधिक दावे महाराष्ट्रातून

करोनाशी संबंधित देशात दाखल झालेल्या एकूण दाव्यांपैकी ३९.४० टक्के दावे महाराष्ट्रातील आहेत. याखालोखाल तामिळनाडू(११.९८ टक्के), कर्नाटक(८.९९ टक्के), गुजरात(९.०८ टक्के), तेलंगणा(८.७० टक्के) दावे दाखल झाले आहेत. देशभरात दाखल झालेल्या एकूण विमा भरपाईमध्ये राज्याचा वाटा जवळपास ३१ टक्के आहे.