संस्थाचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा

मुंबई : यंदा शहरातील अनधिकृत शाळांची आकडेवारी जाहीर करण्याबरोबरच अशा तब्बल २११ शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणतीही नवीन प्राथमिक शाळा पालिकेच्या मान्यतेशिवाय चालवता येत नाही. खासगी शाळांना दरवर्षी पालिकेकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवावा लागतो. तरीही मुंबईत ठिकठिकाणी २११ शाळा अनधिकृतपणे चालवल्या जात आहेत.

पालकांची दिशाभूल करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आयुष्यभराचे शैक्षणिक नुकसान अनधिकृत शाळांमुळे होते. गेल्यावर्षी पालिकेच्या शिक्षण विभागाने अशा २३१ शाळांची यादी जाहीर केली होती. यावर्षी सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात शाळांची संख्या कमी झाली आहे. मात्र यंदा केवळ यादी जाहीर करून पालिका थांबणार नाही. पालिकेची किंवा राज्य सरकारची परवानगी न घेता गल्लीबोळात, लहानशा जागेत चालवल्या जाणाऱ्या या शाळांविरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

शाळेला मैदान असावे, संरक्षक भिंत असावी, शाळेत प्रयोगशाळा असावी अशा अनेक अटी शिक्षण हक्क कायद्यात असून त्यांची पूर्तता होत नसल्यामुळे या शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ग्रँट इन कोड आणि शिक्षण हक्क कायद्यातील तब्बल ४५ निकष या शाळांना लावले जातात. या निकषांची पूर्तता केल्यानंतर या शाळांनी पालिकेकडे अर्ज करायचा असतो. या अटींची पूर्तता केलेली असल्यास त्यांना पालिकेची मान्यता मिळते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र मुंबईतील या शाळा अनेक अटी पूर्ण करीत नाहीत.

कारवाईच्या स्वरूपाबाबत संदिग्धता

अनधिकृतपणे चालणाऱ्या शाळा बंद कराव्या, असे आदेश राज्य सरकारने गेल्यावर्षी काढले होते. तसेच या शाळांच्या संस्थाचालकांना एक लाखाचा दंडही ठोठावण्यात आला होता. तरीही शाळा बंद झालेल्या नाहीत. त्याबाबत पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, या शाळांवर पालिकेने कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. अशा शाळांना दंडही करता येतो. मात्र ही कारवाई कशी करावी याबाबत संदिग्धता आहे. आम्ही राज्य सरकारकडे याबाबत विचारणा केली असून त्यानुसार कारवाई केली जाईल.

काही अनधिकृत मराठी शाळा

’ मातोश्री शांतादेवी जाधव विद्यामंदिर, अभ्युदयनगर, काळाचौकी

’ सरस्वती विद्यालय, दामूनगर, अकुर्ली रोड, कांदिवली पूर्व

’ तुळशीराम रावते प्रा. विद्यालय, असल्फा, घाटकोपर

’ डॉ. आंबेडकर प्रा. विद्यालय, वाशीनाका, चेंबूर

’ महाराष्ट्र विद्यालय, महाराष्ट्रनगर, मानखुर्द (पूर्व)

’ शिवम विद्यामंदिर, लल्लूभाई कंपाऊंड, देवनार

’ कृष्णाजी कदम विद्यालय, खारदेवनगर, चेंबूर गोवंडी रोड

राजीव गांधी विद्यालय, शिवाजीनगर, पार्कसाइट, विक्रोळी पश्चिम

’ फिनिक्स विद्यालय, पारसेवाडी, घाटकोपर (पश्चिम)

’ ज्ञानसागर विद्यालय, इंदिरानगर, घाटकोपर (पश्चिम)

’ संदेश विद्यालय, सूर्यानगर, विक्रोळी (प)

’ नूतन सरस्वती विद्यालय, अमरनगर, खिडीपाडा, मुलुंड.

’ पांडुरंग विद्यालय, एल. बी. एस. रोड, मुलुंड (प)

’ महात्मा फुले विद्यालय, संघर्षनगर, चांदिवली, अंधेरी (पू)

पालकांना आवाहन

या शाळांनी पालकांना सांगून विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत दाखल करावे आणि शाळा बंद करावी, तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी पाल्यासाठी प्रवेश घेऊ  नये, असेही आवाहन पालिकेने  केले आहे.

इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक

अनधिकृत यादीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक १६३  शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या १४, हिंदीच्या १७ आणि उर्दू १७ शाळा आहेत. कांदिवली, बोरिवली, दादर, अंधेरी, शीवमध्ये सर्वाधिक अनधिकृत इंग्रजी तर चेंबूर आणि मानखुर्दमध्ये मराठी शाळा आहेत.