आदिवासी भागातील २१ महिलांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात

मुंबई : एसटी महामंडळात बसगाडय़ांवर वाहक म्हणून महिला असतानाच आता येत्या आर्थिक वर्षांत आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील २१३ महिला चालक कम वाहक म्हणून सेवेत येणार आहेत. आदिवासी भागातील २१ महिलांचे अंतिम प्रशिक्षण सुरू असून प्रथम याच महिला सप्टेंबर २०२० पर्यंत एसटीत दाखल होतील. त्यानंतर चार ते पाच महिन्यांनी दुष्काळग्रस्त भागातील महिलाही रुजू होतील.

आदिवासी भागातील महिलांना रोजगार म्हणून एसटीत भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एसटीत चालक कम वाहक म्हणून भरतीची संधी देण्यात आली. त्यानुसार २१ महिलांची निवड झाली. सध्या त्यांची यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडा येथे एसटीचे प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांचे असून ऑगस्ट २०२० पर्यंत संपेल. त्यानंत सप्टेंबरपर्यंत त्या सेवेत दाखल होतील. त्यांना लांब पल्लय़ाच्या मार्गावर नियुक्त न करता कमी अंतराच्या मार्गावरच काम दिले जाईल. यापाठोपाठ दुष्काळग्रस्त भागातील महिलाही चालक कम वाहक म्हणून सेवेत येणार आहेत. महिला चालक भरती करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी सुरुवात करताच त्यासाठी ६०० अर्ज आले होते. या अर्जाची छाननी केल्यानंतर यातील १९२ महिलांची निवड करण्यात आली. त्यांचे सध्या प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. त्यानंतर शिकाऊ  अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण होईल.या महिला चालकांना सेवेत येण्यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२१ उजाडेल, अशी माहिती देण्यात आली. त्यांना सुरुवातीला १५ हजार रुपयांपासून वेतन मिळण्यास सुरुवात होईल.

*साधारण दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने चालक कम वाहकांची भरती सुरू केली होती.

* यात महिलांसाठीही काही जागा भरल्या जाणार होत्या. त्यावेळीही ४०० पेक्षा जास्त महिलांचे अर्ज एसटीकडे आले होते. मात्र कागदपत्र छाननी व चाचणीतच त्या अपयशी ठरल्या.

* त्यानंतर आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील महिलांना चालक म्हणून भरती करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी काही महिला पुढे आल्या.

* पुणे, नाशिक, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जळगाव, सांगली विभागात महिला चालकांची नियुक्ती होईल.