26 October 2020

News Flash

मुंबईत एका दिवसात २२ रुग्ण

राज्यातील करोनाबाधितांची संख्या १८१वर

करोनाच्या भीतीने अवघा देश घरात बसला असताना मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांत उदरनिर्वाहासाठी येणाऱ्या रोजंदारी मजुरांचे लोंढेच्या लोंढे आपल्या गावांकडे परतण्यासाठी धडपडत आहेत. नवी दिल्लीतून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांकडे जाणारे हजारो मजूर अशा प्रकारे दिल्लीच्या महामार्गावर वाहनांच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी विशेष बससुविधा सुरू केली असली तरी मजुरांच्या संख्येपुढे ते प्रमाण खूपच कमी आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या टाळेबंदीच्या चौथ्या दिवशी मुंबई महानगर क्षेत्रात शनिवारी तब्बल २२ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये सात महिन्यांचे एक बाळ आणि एक वर्षीय मुलाचाही समावेश आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी दोन जणांना संसर्ग कुठून झाला, याचा अद्याप उलगडा झाला नसल्याने करोना संसर्गाने तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबईतील २२ रुग्णांसह राज्यात शनिवारी २८ रुग्णांची नोंद झाली असल्याने महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा १८१वर पोहोचला आहे.

मुंबईत नोंदवण्यात आलेल्या २२ रुग्णांमध्ये मुंबईबाहेरील सात रुग्णांचा समावेश आहे. त्यात पुण्यातील ५७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तिने परदेश प्रवास केला आहे. तर वसईमधील तिघांना लागण झाली असून त्यात दोन पुरुष व एक महिला आहे. हे तिघेही २५ ते ३० या वयोगटातील आहेत. डोंबिवलीतील एक ६० वर्षांची महिला आणि वाशीतील एक वर्षांच्या मुलाचाही रुग्णांत समावेश आहेत. हे सर्व जण आधी सापडलेल्या रुग्णांचे निकटवर्ती आहेत. तर कल्याणमध्ये २८ वर्षांचा एक मुलगा बाधित आढळला असून तो आर्यलडमधून आला होता.

मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी आढळलेल्या रुग्णांची संख्या अनुक्रमे सात आणि आठ आहे. उपनगरातील तिघांनी परदेश प्रवास केला होता तर बाकी सगळे रुग्ण हे आधीच्या रुग्णांचे नातेवाईक आहेत. मात्र दोन रुग्णांना कुठून संसर्ग झाला हे अद्याप कळलेले नाही. त्यामुळे या आजाराने ‘समूह संसर्ग’ या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्याची भीती व्यक्त होत आहे.

रुग्णाच्या मित्रांना लागण

दुबईहून वसईत आलेल्या एका तरुणाच्या तीन मित्रांना करोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले, त्यामुळे वसईतील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ५ एवढी झाली आहे. या सर्वावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरुणांच्या कुटुंबीयांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत.

* राज्यात करोनाबाधित २८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १८१ झाली आहे. सध्या बाधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांमध्ये करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही, तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

* मुंबईत नुकताच एका डॉक्टरचा मृत्यू करोनामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे राज्यातील करोनाबाधित मृत्यूंची संख्या सहा झाली आहे.

* राज्यात शनिवारी एकूण ३२३ जण विविध रुग्णालयांत भरती झाले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात १८ जानेवारीपासून शनिवापर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले होते. ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी प्रतिकू ल आले आहेत, तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

* आतापर्यंत २६ करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७ हजार २९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५९२८ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

* मुंबई ७३;

* कल्याण डोबिवली ७;

* नवी मुंबई ६;

* ठाणे ५;

* पुणे १९;

* पिंपरी चिंचवड १२;

* सांगली २४;

* नागपूर ११

यवतमाळ, वसई विरार येथे प्रत्येकी ४; अहमदनगर ३; सातारा, पनवेल येथे प्रत्येकी २ रुग्णांची नोंद झाली आहे तर उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया येथे प्रत्येकी १ रुग्ण नोंदवला गेला आहे.

जगात २८,६६२ बळी

करोना विषाणूने जगात आतापर्यंत २८,८०२  बळी घेतले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ६,१७,०८४ आहे. अमेरिकेत १,०४,२७७ रुग्ण असून १७३० बळी गेले आहेत. इटलीत मृतांची संख्या आता ९१३४ झाली असून रुग्णांची संख्या ८६,४९८ आहे. चीनमध्ये ३२९५ बळी गेले असून रुग्णांची संख्या ८१,३९४ आहे. स्पेनमध्ये २४ तासांत ८३२ जण मरण पावले त्यामुळे मृतांची संख्या ५८१२ झाली, तर इटलीत एका दिवसात शुक्रवारी ९६९ बळी गेले आहेत. इराणमध्ये आणखी १३९ जणांचा मृत्यू झाला. तेथे २५१७ बळी गेले आहेत. जपानमध्ये आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी म्हटले असून तेथे ५९ जण मरण पावले असून २१८० रुग्ण आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांत आता करोनाचे केंद्र बनला असून त्या देशात ११ बळी गेले आहेत.

देशभरात ९३३ रुग्ण; २१ बळी 

करोना विषाणूची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या शनिवारी ९३३ झाली. यापैकी २१ जणांचा मृत्यू ओढवला आहे. केरळमध्ये या विषाणूचा पहिला बळी शनिवारी नोंदविला गेला. गुजरातमध्ये करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून तेथील बळींची संख्या चार झाली आहे. राजस्थानमध्येही शनिवारी करोनाचे आणखी चार रुग्ण सापडले असून एकूण संख्या आता ५४ झाली आहे.

राज्यात मोफत उपचार

राज्यात आढळणाऱ्या प्रत्येक करोनाबाधितावर मोफत उपचार सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. या उपचाराचा समावेश महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेअंती करोना आजाराचाही या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना अनेक दीर्घ व उपचार खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. सध्या या योजनेत राज्यभरातील ४९२ खासगी रुग्णालये सहभागी आहेत. येत्या १ एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे १००० रुग्णालयांचा समावेश होणार असल्याने तेथेही करोनाबाधितांना उपचार घेता येतील. तसेच या रुग्णालयांतील दोन हजार कृत्रिम श्वसन यंत्रे तसेच एक लाख खाटाही रुग्णांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 2:25 am

Web Title: 22 patients in a day in mumbai abn 97
Next Stories
1 संसर्गाच्या भीतीने डॉक्टरांपासून चार हात दूर
2 मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे स्वतंत्र खाते
3 पोषण आहाराचा शिधा विद्यार्थ्यांना वाटणार
Just Now!
X