महापालिकेची आर्थिक किल्ली समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत गेल्या काही महिन्यांत कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता संमत करण्यात येत आहेत. शुक्रवारी या सगळ्यावर कडी करत अवघी १४ मिनिटे चाललेल्या बैठकीत २२ प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आले. एकाही प्रस्तावाला विरोध करण्याची, चर्चा करण्याची तसदी विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही घेतली नाही आणि अर्थपूर्ण ‘सलोख्या’चे राजकारण करण्यात
धन्यता मानली.
गोरेगाव येथील वीर सावरकर पूल व एस. व्ही. रोड जंक्शनवर उड्डाणपूल, मुलुंड लिंक रोडवरील पादचारी पूल यासह डेंग्यू-मलेरियाच्या जाहिरातीच्या खर्चासाठी कार्योत्तर मंजुरीच्या अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांसह २२ प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आले. एकाही प्रस्तावावर सत्ताधारी किंवा विरोधकांकडून चर्चा, सूचना, उपसूचना, हरकती मांडल्या गेल्या नाहीत. सर्व प्रस्तावांचे विषय एका वाक्यात मांडून अध्यक्ष यशोधर फणसे निर्णय ऐकवत होते व विरोधक माना डोलावत मंजुरी देत होते.
प्रस्ताव मंजूर झाल्यावर काही सदस्यांनी हरकतीचे म्ोुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सभागृह बैठक सुरू होणार असल्याचे कारण पुढे करत अध्यक्षांनी या सूचनाही आटोपत्या घ्यायला लावल्या.