बुलेट ट्रेनसाठी ठाणे आणि विरार येथील दोन स्थानकांची जागा हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या परिसरातील ५३ हजारांऐवजी आता २२ हजार खारफुटी तोडण्यात येणार आहेत.  बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या नॅशनल हाय स्पीड कॉर्पोरेशनने उच्च न्यायालयात  माहिती दिली. तसेच २२ हजार ४०० खारफुटी तोडण्यास आणि दोन्ही स्थानकांच्या कामाला परवानगी देण्याची मागणी केली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याबाबत सुधारित याचिका करण्याचे आदेश कॉर्पोरेशनला दिले.  बुलेट ट्रेनची दोन स्थानके ठाणे आणि विरार येथे बांधण्यात येणार आहेत. या परिसरात मोठय़ा प्रमाणात खारफुटी आहे. आधीच्या प्रस्तावानुसार या दोन स्थानकांसाठी ५३ हजार ४०० खारफुटी तोडण्यात येणार होत्या. ही संख्या मोठी असल्याने स्थानकांची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ५३ हजार ४०० खारफुटींऐवजी २२ हजार ९९७ खारफुटी तोडण्यात येणार आहे.