मुंबईतील दोन लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले असून, बरे झालेल्यांची संख्या ८५ टक्के इतकी आहे. बुधवारी २,२११ रुग्ण आढळून आले, तर ४८ जणांचा मृत्यू झाला. आजमितीस २०,७९० रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या २,३४,६०६ वर पोहोचली असून, त्यापैकी ८५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. बुधवारी नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक म्हणजेच ३३७० इतकी होती. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांपैकी १२,८०५ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. ७६३० रुग्णांना लक्षणे असून, १४०६ रुग्ण गंभीर आहेत.

दरम्यान, बुधवारी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ९,५५२ वर पोहोचली आहे. ४८ मृतांपैकी ४४ मृतांना दीर्घकालीन आजार होते. त्यात २९ पुरुष तर १९ महिला होत्या. ३५ मृतांचे वय ६५ वर्षांवर होते.

रुग्ण दुपटीचा कालावधी ७३ दिवसांवर

सप्टेंबर महिन्यापासून वाढू लागलेला करोनाचा संसर्ग हळूहळू आटोक्यात येऊ लागला आहे. रुग्णवाढीचा दर ०.९५ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून ७३ दिवसांवर गेला आहे. मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ६५० आहे. ९७९९ इमारती प्रतिबंधित आहेत. सध्या दहिसर, बोरिवली, कांदिवली, मुलुंड या भागांत रुग्णवाढ वेगाने होत आहे. मुंबईत आतापर्यंत १२ लाख ९३ हजार चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी १७.९६ टक्के अहवाल बाधित आढळले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात १,२५२ रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी १ हजार २५२ करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ९५ हजार १९२ वर पोहोचली आहे. दिवसभरात ३४ जणांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ४ हजार ९४७ वर पोहोचली आहे.

बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ३२२, कल्याण-डोंबिवलीतील २८६, नवी मुंबईतील २०८, मीरा-भाईंदरमधील १७९, ठाणे ग्रामीणमधील ११६, अंबरनाथ शहरातील ४७, उल्हासनगर शहरातील ४६, बदलापुरातील ३५ आणि भिवंडी शहरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ९, मीरा-भाईंदरमधील ६, ठाणे शहरातील ५, बदलापूर शहरातील ५, नवी मुंबईतील ४, अंबरनाथ शहरातील २, ठाणे ग्रामीणमधील २ आणि उल्हासनगर एकारुग्णाचा समावेश आहे.