मंडप उभारल्यास कारवाई करणार

गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांसाठीच्या परवानगीची सक्ती करणाऱ्या महापालिकेने योग्य कागदपत्रे सादर न करणाऱ्या २२३ मंडळांना परवानगी नाकारली आहे. या मंडळांनी मंडप उभारल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे. मात्र, स्थानिक पोलीस ठाणे तसेच वाहतूक पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करून आवश्यक कागदपत्रे जमा केल्यास त्यांना परवानगी घेता येणार आहे. दरम्यान मंडप परवानगीकरिता २ सप्टेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरवर्षी मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. अनेक मंडळे रस्ते, पदपथावर मंडप उभारत असल्यामुळे पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत न्यायालयाने वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या मंडपांना परवानगी देऊ नये असे आदेश पालिकेला दिले. तसेच अडथळा करणारे मंडप उभे राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येतील, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या मंडप उभारणीबाबत पालिका गंभीर आहे. पालिकेने यंदा प्रथमच मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन पद्धतीने परवानगी देण्याचा निर्णय घेत अर्ज मागविले होते. मुंबईतील तब्बल दोन हजार ६९४ मंडळांनी मंडप परवानगीसाठी पालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. यापैकी काही मंडळांनी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज सादर केले आहेत. असे ५९४ अर्ज पालिकेने बाद केले आहेत. उर्वरित दोन हजार १०० पैकी एक हजार ४२५ म्हणजे ६७ टक्के मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच आवश्यक ती कागदपत्रे सादर न करणाऱ्या २२३ मंडळांचे अर्ज पालिका आणि पोलिसांकडून फेटाळण्यात आले आहेत, अशी माहिती उपायुक्त नरेंद्र बर्डे यांनी दिली.

अर्ज फेटाळण्यात आलेल्या २२३ मंडळांना पुन्हा अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. या मंडळांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांनाही मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात येईल. मात्र परवानगी न घेताच उभारण्यात येणाऱ्या मंडपांवर कारवाई केली जाईल, असे नरेंद्र बर्डे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात पालिका अधिकारी, गणेशोत्सव समन्वय समिती, तसेच गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. जुन्या मंडळांवर कारवाई करू नये, अशी मागणी या वेळी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.