आणखी १८ डॉक्टर तैनात; मंगळवापर्यंत २२४७ जणांची हजेरी

मुंबई : कस्तुरबा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज शेकडो रुग्ण करोनाच्या तपासणीसाठी हजेरी लावत असल्याने पालिकेच्या नायर, केईएम आणि लोकमान्य टिळक रुग्णालयातील १८ डॉक्टरांची येथे नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २२४७ जणांनी कस्तुरबात तपासणीसाठी हजेरी लावली. मंगळवारी १३० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. दरम्यान करोनाच्या उपाययोजनेसाठी तातडीने निधी खर्च करण्याचे पालिका आयुक्तांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत.

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढत असून कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर धास्तावले आहेत. करोनाची बाधा झाल्याचा संशय असलेल्यांच्या कस्तुरबा रुग्णालयात चाचण्या करण्यात येत आहेत. शहरात करोनाच्या तपासणीसाठी बाधित देशातून प्रवास करून आलेले आणि लक्षणे आढळलेले अनेक रुग्ण कस्तुरबात गर्दी करत आहेत. या रुग्णांसोबतच सर्दी, ताप, खोकल्याचा संसर्ग झालेले रुग्णही करोनाचा संसर्ग झाला असेल या भीतीने तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच बाह्य़रुग्ण विभागाबाहेर रांगा लागत आहेत.

संपूर्ण बाह्य़रुग्ण विभागाची जबाबदारी तीन डॉक्टरांवर होती. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालणाऱ्या या विभागामध्ये डॉक्टरांची संख्याही वाढविली आहे. केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक रुग्णालयातून प्रत्येकी ३ असे १८ डॉक्टर कस्तुरबातील बाह्य़रुग्ण विभागात पाठविले असल्याची माहिती पालिकेच्या रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

करोनाबाधितांसाठी अलगीकरण, तर संशयितांना विलगीकरण करण्याची व्यवस्थाही पालिकेकडून करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेनेही कंबर कसली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, तसेच आरोग्य स्वयंसेविका घरोघरी जाऊन नागरिकांशी करोनाविषयी संवाद साधत आहेत. करोनाची बाधा होऊ नये यासाठी काय करावे आणि काय करू नये याविषयी नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.

 

महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार

करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याचे विशेषाधिकार स्थायी समितीने मंगळवारी पालिका आयुक्तांना दिले. करोनाचा मुकाबला करताना निधी खर्च करण्यात आयुक्तांना अडथळा येऊ नये म्हणून स्थायी समितीने तातडीची विशेष बैठक आयोजित करून एकमताने हा निर्णय घेतला. ‘राज्य सरकारने साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७’ आणि ‘घातक रोग प्रसार प्रतिबंधक कायदा १८८८’नुसार मुंबईमध्ये करोना साथीचा आजार म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थेअंतर्गत निर्णय घेऊन तातडीने निधी खर्च करण्यासाठी पालिका आयुक्तांना विशेष अधिकार देण्यात यावे, असे विनंतीपत्र पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सोमवारी पाठविले होते. ही अतिमहत्त्वाची बाब असल्यामुळे स्थायी समितीने त्यास तातडीने मान्यता द्यावी, असेही आयुक्तांनी या पत्रात नमूद केले आहे.

बाह्य़रुग्ण विभागात सोयीसुविधा

कस्तुरबा रुग्णालयात वार्ड क्रमांक ९ मध्ये बाह्य़रुग्ण विभागात लोकसत्ताच्या बातमीनंतर येणाऱ्या संशयित रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्या, पाणी इत्यादी सुविधा निर्माण केलेल्या आहेत. रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलीसही तैनात केले आहेत.  तसेच येथे येणाऱ्या प्रत्येकाला मास्क किंवा रुमाल बांधण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे गर्दी असली तरी तपासणीचे काम सुरळीत सुरू आहे.