मुंबईचा करोना रुग्णसंख्यावाढीचा दर वाढला असून उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या ३१ हजारांच्यापुढे गेली आहे. सोमवारी २२५६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुक्त रुग्णांचा दरही घसरून ७७ टक्के झाला आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर १.२४ टक्के  असून ११ विभागातील रुग्णवाढीचा दर यापेक्षा जास्त आहे. बोरिवलीत हा दर सर्वात जास्त म्हणजे १.६७ टक्के  आहे. बोरिवलीत दर दिवशी सरासरी १५० रुग्णांची नोंद होत असून या भागातील एकूण बाधितांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली आहे. तर याच भागात सर्वाधिक २००० च्यापेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधीही ५६ दिवसांपर्यंत खाली आला आहे.

संपूर्ण मुंबईतील एकूण बाधितांची संख्या १,७१,९४९ झाली आहे. तर एका दिवसात १४३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७७ टक्के म्हणजेच १,३२,३४९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३१,०६३ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत.

मुंबईत आतापर्यंत ९,२५,१४८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. दर दिवशीच्या चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात सलग तीन दिवस १५ हजारापर्यंत चाचण्या एका दिवसात करण्यात आल्या. तर १२ सप्टेंबर रोजी १२ हजार चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांमधून बाधित येण्याचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे.

सोमवारी ३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यातील २४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. २४ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते तर ३ रुग्ण हे चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मुंबईतील २४ विभागांपैकी अंधेरी, जोगेश्वरीचा पूर्व भाग असलेल्या के पूर्वमध्ये आणि माहीम, दादर, धारावीचा भाग असलेल्या जी उत्तरमध्ये मृतांचा आकडा ५०० च्यापुढे गेला आहे.

मुंबईतील करोनाचित्र

* एकूण बाधित  — १,७१,९४९

* करोनामुक्त झाले — १,३२,३४९ (७७ टक्के)

* उपचाराधीन रुग्ण — ३१,०६३

* मृत्यू — ८१७८