‘वंदे भारत मिशन’ या मोहिमेअंतर्गत भारतात आलेल्यांपैकी २२७ जण करोनाबाधित आढळून आल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. तर साध्या स्पर्शाने करोना विषाणूचे संक्रमण होते का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने गुरुवारी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीला करत त्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘वंदे भारत मोहिमे’दरम्यान सुरक्षित वावराच्या नियमाची सर्रास पायमल्ली केली गेल्याचा आरोप करणारी याचिका एअर इंडियाच्या वैमानिकाने केली होती. त्यानंतर प्रवासानंतर किती प्रवासी करोनाबाधित आढळून आले याची विचारणा करत न्यायालयाने त्याचा तपशील सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. याप्रकरणी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करत हा तपशील सादर केला.