राज्यातील पोलीस दलासाठी ‘वाद्यवृंद प्रबोधिनी’ या नावाने खास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचा तळ असलेल्या दौंडजवळील ७५ एकर जागेचा वापर करण्यात येणार आहे. तेथे ९० हजार चौरस फूट जागेवर इमारत बांधण्यात येणार आहे. इमारत बांधकामासाठी तसेच नवीन पदे निर्मिती व भरतीसाठी राज्य सरकारकडे २३ कोटी रुपये मागण्यात आले आहेत, असे समजते.
पुणे जिल्ह्य़ातील दौंडजवळ राज्य राखीव पोलीस दलाचा तळ आहे. त्यासाठी ४१५ एकर जमिनीचा वापर केला जातो. त्यातील ७५ एकर जमीन पोलिसांच्या संगीत अकादमीसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. राज्य राखीव पोलीस दलाकडून चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पोलीस संगीत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याकरिता मान्यता घेण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावात खर्चाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. आता आठवडय़ाभरापूर्वी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात मात्र इमारत बांधकाम आणि नवीन पदांची निर्मिती व भरतीसाठी २३ कोटी रुपये सरकारकडे मागण्यात आल्याचे कळते. सुधारित प्रस्तावात ‘महाराष्ट्र वाद्यवृंद प्रबोधिनी’ असे नाव देण्यात आले आहे. त्यासाठी ९० हजार चौरस फूट जागेवर इमारत बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर ९० नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात एक प्राचार्य, एक उपप्राचार्य, दोन सहायक प्राचार्य आणि इतर प्रशिक्षकांच्या पदांचा समावेश आहे.
पोलीस दलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बँड पथके असतात. मुळात बँड वाजवता येण्याची कला अवगत असणाऱ्यांनाच बँड पथकात भरती करून घेतले जाते. असे असताना केवळ बँडचे प्रशिक्षण देण्यासाठी वेगळे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे आणि त्यासाठी काही कोटी रुपये खर्च करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पोलीस दलातीलच काही अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.