छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभीकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यात येणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

या निधीतून पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनरुज्जीवन, गुंफांचे पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मवती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे पर्यावरण पर्यटन आदी कामे केली जाणार आहेत.